Join us  

IND vs ENG: "जोस बटलरला रोखू शकणारे गोलंदाज आमच्याकडे नाहीत", माजी खेळाडूने व्यक्त केली चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 3:32 PM

Open in App
1 / 7

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) संघ एकमेकांशी भिडणार आहेत. इंग्लिश संघाचा कर्णधार जोस बटलर विश्वचषकात शानदार लयनुसार खेळत आहे. इंग्लंडने आपल्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून उपांत्य फेरीचे तिकिट मिळवले आहे.

2 / 7

उद्या होणारा इंग्लंड आणि भारत यांच्यातील बहुचर्चित सामना ॲडिलेडच्या मैदानावर होणार आहे. ॲडिलेडमधील परिस्थितीबद्दल बोलताना भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने मोठे विधान केले आहे. खरं तर ॲडिलेडच्या मैदानावर फारसा स्विंग नाही आणि भारताकडे वेगवान गोलंदाज नाही हा चिंतेचा विषय असल्याचे आकाश चोप्राने म्हटले आहे.

3 / 7

भारतीय संघाने पाकिस्तान, नेदरलॅंड्स, बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात पावसाने भारताचा बचाव केला होता. कारण बांगलादेशचा सलामीवीर लिटन दास आक्रमक खेळी करून भारताची डोकेदुखी वाढवत होता. याचाच दाखला देत आकाश चोप्राने चिंता व्यक्त केली आहे. लिटन दासविरूद्ध भारतीय गोलंदाज ज्याप्रकारे संघर्ष करत होते, असेच काही जोस बटलरविरूद्ध पाहायला मिळण्याची शक्यता आहे असे चोप्राने म्हटले.

4 / 7

'स्विंगबद्दल भाष्य करायचे झाले तर भारतीय गोलंदाजांनी सर्वांनाच प्रभावित केले आहे. लिटन दासने आपल्याविरुद्ध कशी फलंदाजी केली ते आपण पाहिले. जोस बटलरने असेच केले तर आम्ही काय करू? बटलरला ॲलेक्स हेल्सची साथ मिळेल. मला आशा आहे की बटलर नक्कीच मोठी खेळी खेळेल. आमच्याकडे बटलरला रोखणारा गोलंदाज नाही. ॲडिलेडमध्ये जास्त स्विंग होणार नाही आणि आमच्याकडे दुसरी कोणतीही रणनीती नाही. बाजूच्या सीमारेषा लहान आहेत. पण आमच्याकडे असा एकही गोलंदाज नाही जो १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकेल.' अशा शब्दांत चोप्राने चिंता व्यक्त केली.

5 / 7

खरं तर जिथे स्विंग आहे तिथेच भारतीय गोलंदाजांना यश आले असल्याचे आकाश चोप्राने म्हटले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, गोलंदाजांनी आक्रमणाने काही विशेष केले नाही तरीदेखील त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. ॲडिलेडमध्ये भारतीय गोलंदाजांना स्विंग न मिळाल्यास इंग्लिश फलंदाज वर्चस्व गाजवू शकतात, अशी चिंता माजी सलामीवीराने व्यक्त केली.

6 / 7

आकाश चोप्राने भारतीय गोलंदाजीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'खरं सांगायचे झाले तर भारताची गोलंदाजी चांगली राहिली नाही. पण संघाची गोलंदाजी विश्वचषकात शानदार राहिली आहे. जर खेळपट्टीवरून काही मदत मिळाली तर भारताची गोलंदाजी खरोखरच प्रभावी होते. अन्यथा गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांकडून मोठे फटके बसू शकतात', असे आकाश चोप्राने अधिक म्हटले.

7 / 7

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना उद्या दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होईल. उद्याच्या सामन्यातील विजेत्या संघाला अंतिम फेरीसाठी मेलबर्नचे तिकिट मिळेल. भारतीय संघाने ८ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे, तर इंग्लंडच्या संघाने ७ गुणांसह उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध इंग्लंडजोस बटलररोहित शर्माअर्शदीप सिंग
Open in App