राहुल द्रविड, रोहित शर्मा या ५ पश्नांनी हैराण; उत्तरं मिळाली तर ठिक अन्यथा...

IND vs ENG 3rd Test : विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीनंतर जवळपास १५ दिवसांची विश्रांती भारत-इंग्लंड संघाच्या खेळाडूंना मिळाली. इंग्लंडचा संघ यूएईहून पुन्हा राजकोट येथे दाखल झाला, तर भारतीय संघानेही १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी सराव सुरू केला आहे. मालिकेतील उर्वरित तीन कसोटींसाठी BCCI ने नुकताच संघ जाहीर केला, परंतु मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासमोर डोकेदुखी वाढवणारे ५ प्रश्न उभे राहिले आहेत.

भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातल्या मालिकेत रजत पाटीदारने दमदार कामगिरी केली आणि त्यामुळेच त्याला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या सर्फराज खानला वगळून पाटीदारला संधी दिली गेली, परंतु त्याला विशाखापट्टणम येथे ३२ व ९ धावाच करता आल्या. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याला संधी द्यायची का की सर्फराजला खेळवायचे, हा पेच उभा राहिला आहे.

या मालिकेत लोकेश राहुल यष्टींमागे उभा राहणार नाही, हे द्रविडने आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे केएस भरतची निवड निश्चित होती. मात्र, त्याला ८, ६, २३, १७, ३, ४४, ५, २३, ४१, २८, १७ व ६ अशा धावा करता आल्या आहेत. त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आणि १२ सामन्यांत त्याची सरासरी ही २०.०९ इतकी राहिली आहे. इशान किशन सध्या कुठेच नसल्याने ध्रुव जुरेल हा पर्याय संघ व्यवस्थापनाकडे आहे, त्यामुळे त्याला पदार्पणाची संधी मिळते का, याची उत्सुकता आहे.

राजकोटच्या खेळपट्टीबाबत आताच बरीच चर्चा सुरू झाली आहे. नुकताच येथे रणजी करंडस स्पर्धेचा सामना झाला आणि खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना मदत करताना दिसली. पण, या सामन्यात फिरकीपटू व जलदगती गोलंदाज दोघांनी ५-५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ फिरकीपटू खेळवायचे की दोन जलदगती गोलंदाज, असा पेच निर्माण झाला आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांचे स्थान पक्के होऊ शकते. रवींद्र जडेजा फिट झाला असेल तर कुलदीप यादवला बसवावे लागेल किंवा मुकेश कुमारला डावलून ४ फिरकीपटू संघाला खेळवता येतील.

भारतीय संघ दोन जलदगती गोलंदाजांसह खेळण्यास उतरला तर जसप्रीत बुमराहचा जोडीदार कोण असेल, हा प्रश्न आहे. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप हे पर्यात संघ व्यवस्थापनाकडे आहेत. यात सिराजचे पारडे जड आहे. मुकेशला दुसऱ्या कसोटीत फार कमाल करता आली नाही.

दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घेणारा रवींद्र जडेजा पुन्हा तिसऱ्या कसोटीसाठी संघात परतला आहे. हॅमस्ट्रींग दुखापतीमुळे त्याने माघार घेतली होती. त्याने फिटनेस टेस्ट पास केली तर तो तिसरी कसोटी निश्चित खेळेले.

शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतात संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप