IND vs ENG: तिसऱ्या सामन्यात भारताचीच 'कसोटी', तीन कारणांमुळं इंग्लंडचं पारडं जड

IND vs ENG 3rd test match: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून खेळवला जात आहे. राजकोट येथील या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. दुसऱ्या सामन्यानंतर दोन्हीही संघातील खेळाडूंनी चांगली विश्रांती घेतली.

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना यजमान भारतीय संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण या सामन्यात टीम इंडियात युवा खेळाडूंची फौज आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारत ही मालिका खेळत आहे.

किंग कोहलीने वैयक्तिक कारणास्तव इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. शुबमन गिलला देखील एक शतकी खेळी वगळता काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे राजकोटच्या खेळपट्टीवर भारताच्या युवा फलंदाजांची कसोटी लागू शकतो.

युवा सर्फराज खानचे पदार्पण होण्याची दाट शक्यता आहे. अनुभवी फलंदाज लोकेश राहुल दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे.

एकूणच भारताच्या मधल्या फळीत अननुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे दबावाच्या स्थितीत डाव सावरण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असेल. अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीतून सावरला आहे.

तिसऱ्या सामन्यात सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि देवदत्त पड्डिकल यांपैकी कोणाला संधी मिळते हे पाहण्याजोगे असेल. पड्डिकलला राहुलच्या जागी संधी देण्यात आली आहे.

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहला राजकोट कसोटीतून विश्रांती दिली जाऊ शकते.

बुमराहने आतापर्यंत या मालिकेत भारतासाठी सर्वाधिक बळी घेतले आहेत. एकूण १५ बळी पटकावून बुमराहने इंग्लिश फलंदाजांना घाम फोडला. दुसऱ्या सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या डावात बुमराहने अनुक्रमे ६ आणि ३ बळी घेत सामनावीरचा पुरस्कार जिंकला.

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, देवदत पड्डिकल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.