Join us  

Jasprit Bumrah, IND vs ENG 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहने इंग्रजांना लोळवले, मोठ मोठे विक्रम करत दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 8:18 PM

Open in App
1 / 10

India vs England 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. जसप्रीतने १९ धावांत ६ विकेट्स घेताना इंग्लंडचा संपूर्ण संघ ११० धावांत तंबूत पाठवला. भारताविरुद्धही इंग्लंडची ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. मोहम्मद शमीने तीन, तर प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली.

2 / 10

जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच षटकात इंग्लंडच्या जेसन रॉय व जो रूट यांना माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद शमीने बेन स्टोक्सची विकेट घेतली. हे तिघेही शून्यावर माघारी परतले. पुढच्याच षटकात जसप्रीतने जॉनी बेअरस्टोला ( ७) झेलबाद आणि लिएम लिव्हिंगस्टोनला ( ०) त्रिफळाचीत केले. इंग्लंडचा निम्मा संघ २६ धावांवर माघारी परतला होता.

3 / 10

२००५नंतर प्रथमच भारतीय गोलंदाजांनी वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या १० षटकांत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. जसप्रती बुमराहने पॉवर प्लेमध्ये दम दाखवला. पहिल्या १० षटकांत चार विकेट्स घेणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी २०१३ मद्ये भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेविरुद्ध आणि २००३मध्ये जवागल श्रीनाथने श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती.

4 / 10

वन डे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडचे चार फलंदाज एकाच डावात शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे. १९७९ साली लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना भोपळा फोडू दिला नव्हता. त्याआधी ऑस्ट्रेलियाने १९७७मध्ये बर्मिंगहॅम येथे चौघांना शून्यावर बाद केले होते आणि त्यानंतर आज भारताने कमाल करून दाखवली. आजच्या सामन्यात जेसन रॉय ( ५ चेंडू), जो रूट ( २ चेंडू), बेन स्टोक्स ( १ चेंडू), लिएम लिव्हिंगस्टोन ( ८ चेंडू) हे शून्यावर बाद झाले.

5 / 10

मोईन अली व जोस बटलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रसिद्ध कृष्णाने स्वतःच्याच गोलंदाजीवर भन्नाट रिटर्न कॅच पकडला. पाठोपाठ जोस बटलर ( ३०) झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. शमीने पुढच्याच षटकात क्रेग ओव्हरटनचा ( ८) त्रिफळा उडवून वन डेतील १५० वी विकेट घेतली. भारताकडून सर्वात जलद १५० विकेट्स घेण्याचा विक्रम शमीने नावावर केला. त्याने ८० सामन्यांत हा पराक्रम केला अन् अजित आगरकरचा ( ९७ सामने) विक्रम मोडला.

6 / 10

जागतिक गोलंदाजांमध्ये सर्वात कमी सामन्यांत १५० विकेट्स घेणारा शमी हा चौता गोलंदाज ठरला. मिचेल स्टार्क ( ७७), सकलेन मुश्ताक ( ७८) व राशिद खान ( ८०) हे आघाडीवर आहेत. शमीने आज न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचा ( ८१) विक्रम मोडला.

7 / 10

भारताने २००६मध्ये जयपूर वन डेत इंग्लंडला १२५ धावांत गुंडाळले होते आणि तो भारताविरुद्धचा त्यांचा निच्चांक स्कोअर होता. भारताने २०१४ मध्ये बांगलादेशला ५८, २००५मध्ये झिम्बाब्वेला ६५, २००३मध्ये बांगलादेशला ७६, २०१६मध्ये न्यूझीलंडला ७९, १९८५ मध्ये पाकिस्तानला ८७ आणि २००३मध्ये केनियाला ९० धावांत गुंडाळले होते. भारताविरुद्ध आता ११० ही इंग्लंडची निचांक धावसंख्या आहे.

8 / 10

डेव्हिड विली व ब्रेडन कार्स यांची ३५ धावांची भागीदारी बुमराहने संपुष्टात आणली. त्याने कार्सचा ( १५) त्रिफळा उडवला. बुमराहने विलीलाही ( २१) माघारी पाठवून इंग्लंडचा डाव ११० धावांत गुंडाळला. बुमराहने १९ धावांत ६ विकेट्स घेताना इंग्लंडमध्ये भारतीय गोलंदाजाने केलेल्या सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम नावावर केला. यापूर्वी कुलदीप यादवने २०१८मध्ये २५ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.

9 / 10

इंग्लंडमध्ये वन डे क्रिकेटमध्ये सहा विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह हा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज ठरला. भारताकडून सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ही स्टुअर्ट बिन्नी ( ६/४ वि. बांगलादेश, २०१४) व अनिल कुंबळे ( ६/१२, वेस्ट इंडिज, १९९३) यांच्या नावावर आहे. त्यानंतर जसप्रीतचा क्रमांक येतो.

10 / 10

इंग्लंडमध्ये वन डेत ६ किवां त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये बुमराह चौथ्या क्रमांकावर येतो. या विक्रमात वकार युनिस ( ७/३६ वि इंग्लंड २००१), विंस्टन डेव्हिड ( ७/५१ वि ऑस्ट्रेलिया १९८३), गॅरी गिलमोर ( ६/१४ वि. इंग्लंड १९७५) हे आघाडीवर आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहकुलदीप यादवमोहम्मद शामी
Open in App