भारताचा 'हिटमॅन' लय भारी, 'कॅप्टन कूल' धोनीशी केली बरोबरी! रोहित शर्माचा धडाकेबाज पराक्रम

रोहितने तुफानी शतक ठोकलेच, पण त्यासोबत एका मोठ्ठा विक्रमही आपल्या नावे केला

Rohit Sharma MS Dhoni Team India, IND vs AFG: भारतीय संघाने अफगाणिस्तान विरूद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० मालिकेत रोमहर्षक विजय मिळवला. संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने सामन्यात दमदार शतक ठोकले तर नंतर झालेल्या सुपर ओव्हर्समध्येही तुफान फटकेबाजी केली.

भारतीय संघाने रोहित शर्माच्या नाबाद १२१ धावांच्या खेळीच्या जोरावर आणि रिंकू सिंगच्या नाबाद ६९ धावांच्या फटकेबाजीवर २१२ धावा केल्या. सुरूवातीला ४ धावांत ४ गडी बाद होऊन या दोघांनी तुफानी खेळी केली.

२१३ धावांचे लक्ष्य गाठताना अफगाणिस्तानच्या संघाने कडवी झुंज दिली. गुलबदीन नईब (५५*), कर्णधार इब्राहिम आणि सलामीवीर गुरबाझ यांच्या अर्धशतकांच्या जोरावर अफगाणिस्तानने सामना बरोबरीत सोडवला.

त्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर दोन्ही संघांनी १६ धावा केल्या आणि पहिली सुपर ओव्हर बरोबरीत सुटली. त्यात रोहित शर्माने २ षटकार खेचून संघाला विजयी करण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही.

पुढे दुसरी सुपर ओव्हर खेळावी लागली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहितने पहिल्या तीन चेंडूत ११ धावा केल्या. त्यानंतर दोन चेंडूत भारताने दोन गडी गमावले. अफगाणिस्तानला १२ धावांचे आव्हान असताना त्यांचे एका धावेतच दोन गडी बाद झाले आणि अखेर भारताला विजय मिळवला.

भारताच्या या विजयामुळे रोहित शर्माने कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहित शर्माने अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यातील विजय मिळवत कर्णधार म्हणून ४२ टी२० विजय पूर्ण केले. धोनीला हा टप्पा गाठण्यासाठी ७२ सामने खेळावे लागले होते, रोहितने केवळ ५४ सामन्यात हा पराक्रम केला.