IPL मध्ये गंभीरच्या नावावर मोठा 'विक्रम', धोनीला थोडक्यात आले अपयश, पंजाबचाही गड ढासळला

gautam gambhir ipl : आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या नावाचा उल्लेख केला जातो.

इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. रोहित शर्माने पाचवेळा तर धोनीने चारवेळा या स्पर्धेचा किताब पटकावला आहे.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. रोहित आणि धोनीनंतर आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून कोणाकडे पाहिले जाते तर ते नाव म्हणजे गौतम गंभीर.

गौतम गंभीरच्या नावावर आयपीएलमध्ये अशा विक्रमाची नोंद आहे, ज्याला अद्याप एकही कर्णधार मोडू शकलेला नाही. कॅप्टन कूल धोनी गंभीरच्या या विक्रमाच्या अगदी जवळ आला होता पण तो देखील गंभीरला याबाबतीत मागे टाकू शकला नाही.

गौतम गंभीरच्या नावावर आयपीएलमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आहे. आयपीएल २०१३ आणि २०१४ मध्ये मिळून कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने सलग १० सामने जिंकले होते.

गौतमचा हा विक्रम आजतागायत कोणता कर्णधार मोडू शकलेला नाही. २०१४ मध्ये केकेआरचा संघ चॅम्पियन झाला होता. यापूर्वी २०१२ मध्ये देखील केकेआरने आयपीएलचा किताब पटकावला होता.

सलग सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर धोनीचा नंबर लागतो. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने २०१४ मध्ये सलग ७ सामने जिंकले होते. जर सीएसकेने आणखी ३ सामने जिंकले असते तर माहीने गंभीरच्या विक्रमाची बरोबरी साधली असती.

दरम्यान, संघांच्या बाबतीत पंजाब किंग्जचा संघ केकेआरनंतर अशी कामगिरी करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाबने आयपीएलमध्ये सलग आठ सामने जिंकले आहे.

२०१३ मध्ये पंजाबच्या संघाने डेव्हिड हसीच्या नेतृत्वात साखळी फेरीतील अखेरचे तिन्ही सामने जिंकले होते.

यानंतर २०१४ मध्ये जॉर्ज बेलीच्या नेतृत्वात पंजाबच्या शिलेदारांनी सलग पाच सामने जिंकले होते. पण कर्णधार म्हणून पाहिले तर सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम गौतम गंभीरच्या नावावर आहे.