मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आणखी वाढ; ८ कोटीच्या गोलंदाजाच्या दुखापतीनं वाढवलं टेन्शन

jofra archer ipl 2023 : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ अर्थात मुंबई इंडियन्स सध्या संघर्ष करत असून संघाला सातपैकी केवळ तीन सामने जिंकता आले आहेत. आताच्या घडीला रोहित शर्माचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

मुंबईचा आगामी सामना ३० एप्रिल रोजी आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्ससोबत होईल. मुंबईची गोलंदाजी ही संघाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. कारण काल झालेल्या सामन्यात देखील गुजरात टायटन्सने खराब गोलंदाजीचा फायदा घेत धावसंख्या २०० पार नेली.

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चरच्या खांद्यावर मुंबईच्या गोलंदाजीची जबाबदारी होती. पण सलामीचा सामना खेळल्यानंतर पंजाबविरूद्धचा सामना वगळता आर्चर दुखापतीमुळे इतर सामन्यांना मुकला आहे.

मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर होता. ८ कोटी रूपयात खरेदी केलेल्या गोलंदाजांने मुंबईसाठी केवळ २ सामने खेळले आहेत.

आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्याविरूद्धच्या सामन्यात आर्चर दिसला होता. पण काल झालेल्या सामन्यात तो खेळला नाही. कर्णधार रोहित शर्माने आर्चर तंदुरूस्त नसल्याचे कारण सांगितले. पण नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, जोफ्रा आर्चर नुकताच एका छोट्या शस्त्रक्रियेसाठी बेल्जियमला ​​गेला होता.

टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, आर्चर छोट्या शस्त्रक्रियेसाठी बेल्जियमला गेला होता. मागील २५ महिन्यातील त्याची ही पाचवी शस्त्रक्रिया आहे. त्याच्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली असून याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

माहितीनुसार, "इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने माहिती दिली की, जोफ्रा आर्चरने बेल्जियममधील त्याच्या तज्ञाची भेट घेतली. तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतर भारतात परतण्यापूर्वी जोफ्रा आर्चरवर एक किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समजते."

जोफ्रा आर्चर मागील शनिवारी पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात खेळला होता. तेव्हा तो पूर्णपणे तंदुरूस्त दिसत होता. त्याने या सामन्यात ४ षटके टाकली, ज्यामध्ये आर्चरने १४५ प्रति तास वेगाने गोलंदाजी केली.

लक्षणीय बाब म्हणजे जोफ्रा आर्चर आणखी काही सामने विश्रांती घेण्याची शक्यता आहे. आर्चरसाठी २०२१ हे वर्षे एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिले, कारण त्याला या संपूर्ण वर्षात कोपऱ्याच्या दुखापतीचा सामना करावा लागला.

दुखापतीमुळे तो ॲशेस मालिका आणि ट्वेंटी-२० विश्वचषकातून देखील बाहेर झाला होता. तरीदेखील आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने ८ कोटी रूपयांत त्याला आपल्या ताफ्यात घेतले. पण तो आयपीएल २०२२ मध्ये खेळू शकला नव्हता.