चेन्नईचे ३०.२५ कोटी पाण्यात! मुंबईला २० कोटीचा फटका; चार खेळाडूंमुळे संघांना लागला चुना

ipl 2023 injury news : इंडियन प्रीमिअर लीगच्या सोळाव्या हंगामाचा निम्मा टप्पा पार पडला आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या सोळाव्या हंगामाचा निम्मा टप्पा पार पडला आहे. या हंगामासाठी जवळपास सर्वच फ्रँचायझींनी नामांकित खेळाडू खरेदी करण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला. पण हंगामाच्या सुरूवातीपासूनच स्पर्धेला दुखापतीचे ग्रहण लागले आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जचा संघ आताच्या घडीला गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पण चेन्नईच्या संघाचा सर्वात महागडा खेळाडू अद्याप संघाबाहेर आहे.

चेन्नईप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या संघाची स्थिती देखील अशीच आहे. कारण ज्या दोन खेळाडूंसाठी मुंबईच्या फ्रँचायझीने कोट्यवधी खर्च केले ते दुखापतीमुळे बाहेर आहेत.

चेन्नईच्या संघाबद्दल भाष्य करायचे झाले तर, धोनीच्या संघाचे ३०.२५ कोटींचे नुकसान झाल्याचे दिसते. कारण चेन्नईने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला तब्बल १६.२५ कोटीत आपल्या ताफ्यात घेतले होते.

पण दोन सामने खेळल्यानंतर स्टोक्स बाकावर बसला आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या स्टोक्सला त्याने खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये देखील काही खास कामगिरी करता आली नाही.

बेन स्टोक्सशिवाय दीपक चाहरच्या दुखापतीने देखील चेन्नईची डोकेदुखी वाढली आहे. आयपीएल २०२२ च्या लिलावात चाहरवर चेन्नईने १४ कोटी रूपये खर्च केले होते.

आयपीएल २०२३ मध्ये चाहरने ३ सामने खेळले असून एकही बळी घेता आला नाही. त्याच्या खेळण्यावर देखील अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे स्टोक्स (१६.२५) आणि चाहर (१४) असे मिळून चेन्नईच्या संघाचे ३०.२५ कोटीचे नुकसान झाले आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएल २०२२ साठी जसप्रीत बुमराहला १२ कोटीमध्ये संघात कायम ठेवले होते. याशिवाय इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला ८ कोटीमध्ये आपल्या ताफ्यात घेतले होते.

खरं तर दुखापतीमुळे आर्चर २०२२ च्या हंगामातून बाहेर होता. तेव्हा बुमराहने संघाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली होती. पण बुमराह आणि आर्चर एकत्र खेळण्याचे मुंबईचे स्वप्न अद्याप स्वप्नच राहिले आहे.

जसप्रीत बुमराह मागील मोठ्या कालावधीपासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल २०२३ मधून बुमराह आधीच बाहेर झाला आहे, तर आर्चरने केवळ २ सामने खेळले आहेत.

बुमराह-आर्चरच्या जोडीची कमतरता मुंबईच्या संघाला जाणवत असून संघ संघर्ष करत आहे. या जोडीच्या अनुपस्थितीमुळे फ्रँचायझीचे २० कोटी पाण्यात गेल्याचे चित्र आहे.