T20 World Cup : "Suryakumar Yadav खेळला नाही, तर भारताला १४०-१५० धावा करणेही मुश्कील होईल!"

T20 World Cup 2022 : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हा भारताच्या मधल्या फळीला मिळालेला वरदान ठरतोय. मार्च २०२१मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पदार्पण केल्यानंतर सूर्याने मागे वळूनच पाहिले नाही.

T20 World Cup 2022 : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हा भारताच्या मधल्या फळीला मिळालेला वरदान ठरतोय. मार्च २०२१मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पदार्पण केल्यानंतर सूर्याने मागे वळूनच पाहिले नाही. एबी डिव्हिलियर्सननंतर 'Mr 360' अशी ओळख सूर्याला मिळतेय. पण, सूर्यकुमार हा आपल्यापेक्षाही सरस असल्याचे एबीने नुकतेच मान्य केले.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही सूर्याने मधल्या फळीचा भार आपल्या खांद्यावर उचलला आहे आणि त्याना १९४+च्या स्ट्राईक रेटने ५ सामन्यांत २२५ धावा चोपल्या आहेत. या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहली ( २४६) व मॅक्स ओ'डाऊड ( २४२) यांच्यानंतर सूर्याचाच नंबर येतो. पण, सूर्यकुमार खेळला नाही, तर भारतीय संघाला १४०-१५० धावा करणेही मुश्कील जाईल, असे विधान महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी केले आहे.

सूर्यकुमार यादव हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा हुकूमी एक्का ठरतोय. सूर्यकुमारचा एक खराब दिवस अन् भारतीय संघाची १४०-१५० धावा करताना दमछाक होईल, असे स्पष्ट मत गावस्करांनी व्यक्त केले.

''सूर्यकुमारची प्रत्येक खेळी ही जवळपास ३६० डिग्री अशीच आहे. तो आता नवा Mr. 360 डिग्री आहे. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून त्याने टोलावलेला षटकार हा अविश्वसनीय होता. गोलंदाज ज्या अँगलने चेंडू टाकेल, तसा सूर्या स्वतःला ॲडजस्ट करून फटके मारतोय. त्याच्या डिक्शनरीत प्रत्येक शॉट आहे. त्याच्याकडे स्ट्रेट ड्राईव्हही आहे,''अशा शब्दांत गावस्करांनी त्याचे कौतुक केले.

रविवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातही सूर्याने २५ चेंडूंत ६१ धावांची खेळी केली. त्याच सहा चौकार व ४ षटकारांचा समावेश होता. गावस्कर म्हणाले,''सूर्यकुमार असा फलंदाज आहे की जो भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात सक्षम आहे. १८७ धावा या भारताच्या मेलबर्नवरील सर्वोत्तम धावा ठरल्या आहेत. त्याच्या नाबाद ६१ धावा नसत्या, तर भारतीय संघ १५० धावापर्यंतही पोहोचला नसता.''

''विराट कोहली आणि सूर्यकुमार हे दोन फलंदाज सध्याच्या घडीला भारतासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. लोकेश राहुलचे आणखी एक अर्धशतक पाहून आनंद झाला, परंतु त्यापुढचा विचार करायला हवा. सूर्याची बॅट एखाद्या सामन्यात नाही चालल्यास भारताला १४०-१५० धावाही करता येणार नाही. त्यामुळे लोकेशने सातत्य राखणे महत्वाचे आहे,''हे गावस्कर पुन्हा म्हणाले.