Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022: रोहित शर्मा कर्णधारपद सोडल्यास 'मुंबई इंडियन्स'कडे आहेत ३ दमदार पर्याय

सलग आठ पराभवानंतर रोहितने कर्णधारपद सोडण्याची मागणी

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून अतिशय दमदार कारकिर्द सुरू केलेला स्टार क्रिकेटर रोहित शर्मा सध्या मात्र फार विचित्र अवस्थेतून जातोय. मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेतेपद मिळवून देणारा रोहित यंदाच्या हंगामात अजूनही पहिल्या विजयाची वाट पाहतोय.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या हंगामात तब्बल ८ सामने खेळले आहेत. पण दुर्दैवी बाब म्हणजे, मुंबईच्या संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. अशा परिस्थतीत, रोहितने संघाचे कर्णधारपद सोडावे अशी ओरड चाहत्यांकडून ऐकू येत आहे.

रोहित शर्मा स्वत: फलंदाजीत अपयशी ठरतोय. तसेच कर्णधार म्हणूनही त्याला फारशी चमक यंदाच्या हंगामात दाखवता आलेली नाही. त्यामुळे रोहित हंगामाच्या मध्यातच कर्णधारपद सोडू शकतो अशी चर्चा रंगली आहे. तसे झाल्यास रोहिच्या जागी कर्णधारपद स्वीकारण्यासाठी मुंबई इंडियन्सकडे पुढील तीन पर्याय आहेत.

किरॉन पोलार्ड (Kieron Pollard)- मुंबई इंडियन्सचा तगडा फलंदाज किरॉन पोलार्ड मुंबईचे कर्णधारपद सांभाळू शकतो. २०१०पासून तो या संघासोबत खेळत आहे. त्याने मुंबईकडून १८६ सामन्यात २१३३ धावा आणि ६८ विकेट्स घेतल्या आहेत. रोहितच्या अनुपस्थितीत पोलार्डने अनेकदा संघाचे नेतृत्व याआधीही केले आहे.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) - IPLच्या ११ व्या हंगामापासून सूर्यकुमार यादव हा मुंबई संघाचा एक अविभाज्य घटक आहे. त्याने गेल्या चार वर्षात मुंबईकडून १४ अर्धशतके ठोकली आहेत. तसेच टीम इंडियातील त्याची कामगिरीदेखील खूपच चांगली आहे.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) - ऑस्ट्रेलियन संघाने पॅट कमिन्सला कर्णधार बनवल्यापासून एक नवा विचार विविध संघांमध्ये तयार होताना दिसतोय. त्याचाच प्रत्यय मुंबईच्या संघात येऊ शकतो. बुमराह हा एक अनुभवी आणि महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १३५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रोहितचा उपकर्णधार म्हणून त्याची निवड झाली होती.