WTC Final: किंग कोहलीचा 'डबल धमाका'! ऑस्ट्रेलियाची धुलाई करत विराटचा मोठा पराक्रम

Virat Kohli Records, WTC Final 2023 IND vs AUS: विराटने चौथ्या डावात दोन धडाकेबाज विक्रमांना घातली गवसणी

Virat Kohli Records Team India, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 4 stumps : भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावाता निराशा केल्यानंतर दुसऱ्या डावात मात्र आतापर्यंत चांगली झुंज दिली. ऑस्ट्रेलियाच्या ४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने चौथ्या दिवसअखेर ३ बाद १६४ धावा केल्या.

शुबमन गिल स्वस्तात माघारी परतला. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात भागीदारी झाली. पण ते दोघे तंबूत परतल्यावर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोन अनुभवी फलंदाजांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकला.

आता शेवटच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी ९७ षटकांत २८० धावांची गरज आहे तर ऑस्ट्रेलियन संघाला ७ विकेट्सची आवश्यकता आहे. पण आजच्या दिवसाच्या खेळात विराट कोहलीने एका खेळीत दोन विक्रम केले.

चौथ्या डावात शुबमन गिलची विकेट काहीशी वादग्रस्त ठरली. रोहित शर्मा (४३) आणि चेतेश्वर पुजारा (२७) यांनाही मोठी खेळी करता आली नाही. पण विराटने अजिंक्यच्या साथीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत किल्ला लढवला.

विराट कोहलीने आजच्या दिवसाच्या खेळात नाबाद ४४ धावा केल्या. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५००० धावांचा टप्पा ओलांडला. असा पराक्रम करणारा तो जगात दुसरा ठरला. यादीत सचिन तेंडुलकर (६७०७) पहिला, ब्रायन लारा (४७१४) तिसरा, डेसमंड हेन्स (४४९५) चौथा आणि व्हिव रिचर्ड्स (४४५३) पाचवा आहे.

विराट कोहलीने चौथ्या दिवसाच्या खेळात आणखी एक पराक्रमही करून दाखवला. विराट कोहलीने चौथ्या डावात मैदानात उतरून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेतला आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पाही पूर्ण केला. (ICC World Test Championship Final 2023)