WTC Final: ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 400+ म्हणजे 'टीम इंडिया'साठी गूड न्यूज, जाणून घ्या कसं?

Team India Australia, WTC Final 2023 IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभारला असला तरी भारतासाठी ही खुशखबरच... कसं ते आकडेवारीतून समजून घ्या

Good News for Team India Australia 400+ score in 1st innings, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 3: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी विश्वविजेतेपदाच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा केली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४६९ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ५ बाद १५१ धावा केल्या.

ट्रेव्हिस हेड (१६३) आणि स्टीव्ह स्मिथ (१२१) यांच्या शतकाने ऑस्ट्रेलियाने साडेचारशे पार मजल मारली. त्यानंतर भारताचे रोहित, गिल, पुजारा, कोहली स्वस्तात बाद झाले. जाडेजाने झुंज दिली, पण त्याचे अर्धशतक हुकले.

आता संघाची मदार अनुभवी मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे याच्यावर आहे. ऑस्ट्रेलियाची सध्या जरी सामन्यात पकड दिसत असली तरी ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावातील स्कोअर हा भारतासाठी एक खुशखबरच आहे, जाणून घ्या त्यामागचे कारण...

ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ नेहमीच कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रबळ दावेदार मानला जातो. यंदाच्या कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला. त्यांच्या वरच्या फळीतील सर्वच फलंदाजांनी २०२१ ते २०२३ या वेळेत दमदार कामगिरी केली.

कसोटी विश्वविजेतेपदाच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. पण त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड जोडीने २८५ धावांची भागीदारी केली. ट्रेव्हिस हेड १७४ चेंडूत २५ चौकार आणि एका षटकारासह १६३ धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने २६८ चेंडूत १२१ धावांचे योगदान दिले. या दोघांनी ऑस्ट्रेलियाला ४०० पार नेले. पण हाच ऑस्ट्रेलियासाठी धोका आणि भारतासाठी खुशखबर आहे.

एका आकडेवारीनुसार, आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने देशाबाहेर भारताविरूद्ध ११ वेळा पहिल्या डावात ४००+ धावा केल्या आहेत. पण यातील केवळ एक सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. महत्त्वाचे म्हणजे, यातील ४ सामने भारताने दमदार कमबॅक करत जिंकले आहेत. तर ४ सामने अनिर्णित आणि १ सामना बरोबरीत सुटला आहे. या आकडेवारीमुळे ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावातील कामगिरी भारतासाठी 'गुड न्यूज'च आहे.