टीम इंडियानं ओव्हल जिंकून इंग्लंडसोबत पाकिस्तानलाही दिलाय धक्का; जागतिक कसोटीत घेतलीय मोठी आघाडी

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : टीम इंडियानं चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी यजमान इंग्लंडचा डाव २१० धावांवर गुंडाळून १५७ धावांनी विजय मिळवताना मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गडगडल्यानंतर इंग्लंडनं प्रत्युत्तरात २९० धावा करून ९९ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारतानं दुसऱ्या डावात ४६६ धावा कुटल्या व इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडला हे आव्हान पेलवलं नाही. या विजयासोबत टीम इंडियानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे.

पहिल्या डावात शार्दूल ठाकूरच्या ५७ धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यामुळेच टीम इंडियानं १९१ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावात रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी चांगली सुरूवात करून दिल्यानंतर चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांनी चांगली साथ दिली. रोहित शर्माचे शतक अन् शार्दूल ठाकूर व रिषभ पंत यांचे अर्धशतक हे दुसऱ्या डावातील महत्त्वाचे टप्पे ठरले. त्यांच्या जोरावर टीम इंडियानं तगडे आव्हान ठेवले.

पाचव्या दिवसाच्या लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी डाव पलटवला. शार्दूलन इंग्लंडचा कर्णधार जो रूटची विकेट घेत भारताचा विजय पक्का केला. या सामन्यात उमेश यादवनं तीन, बुमराह, शार्दूल व जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

या विजयानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात २६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तानची १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे, तर इंग्लंड १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर गेला आहे.