वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावू! रोहित शर्माचा निर्धार, प्रतिस्पर्धींना दिली 'एका' गोष्टीची खात्री

ICC World Cup 2023 : सराव सामने संपले अन् आता वन डे वर्ल्ड कपला अवघे काही तास शिल्लक राहिले. ५ ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून ही महास्पर्धा सुरू होतेय आणि गत विजेता इंग्लंड व गत उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आज सर्व कर्णधारांनी त्यांच्या तयारीचा आढावा सांगितला अन् वर्ल्ड कप जिंकण्यासाठी कडवी टक्कर देणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. भारत यजमान असल्याने यंदाचा वर्ल्ड कप रोहित शर्मा अँड टीम जिंकेल असा विश्वास अनेकांना आहे.

रोहितनेही आज त्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावू असा निर्धार बोलून दाखवला. याचवेळी रोहितने सहभागी संघांच्या कर्णधार आणि खेळाडूंना एका गोष्टीची खात्री दिली.

आम्ही या स्पर्धेत आमचा सर्वोत्तम खेळ करू आणि वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, असे विधान रोहितने यावेळी केली. तो पुढे म्हणाला,'' मागील तीन वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये यजमान संघ जिंकला आहे, पण या गोष्टीचा मी जास्त विचार करत नाही. आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू आणि या स्पर्धेचा मनापासून आनंद लुटू. आम्ही आमच्या रणनीतीची कशी अंमलबजावणी होईल हे पाहू आणि आमच्या कौशल्याचा पूर्ण वापर करून वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करू.''

या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला सर्वाधिक ९ शहरांमध्ये सामने खेळायचे आहेत आणि त्यामुळे त्यांना खूप प्रवास करावा लागणार आहे. तसेच सराव सामने पावसामुळे वाया गेले, यावर रोहित म्हणाला, आमच्या संघाला खूप प्रवास करावा लागणार आहे, परंतु आम्हाला विश्रांतीसाठी वेळ मिळणार आहे. सराव सामने पावसामुळे वाया गेल्याने आम्हाला विश्रांती करण्याची संधी मिळाली ( हसत हसत).''

तो पुढे म्हणाला,''मी या स्पर्धेत सहभागी संघांच्या कर्णधारांना आणि खेळाडूंना एक खात्री देऊ इच्छितो की भारतात होणारा हा वर्ल्ड कप तुम्हाला थक्क करेल आणि भारतात होणाऱ्या या स्पर्धेच्या तुम्ही प्रेमात पडाल. माझ्यामते खेळाडूला तुम्ही स्वातंत्र्य दिले की तो त्याच्या संपूर्ण क्षमतेनं खेळतो. कर्णधार म्हणून खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक देणे ही माझी जबाबदारी आहे.''

वर्ल्ड कप साठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.