८ मोठे विक्रम! मोहम्मद शमीची रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी; रोहित शर्माची ठरला जगात भारी!

ICC ODI World Cup IND vs SL Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग सातव्या विजयाची नोंद करून उपांत्य फेरीचे स्थआन पक्के केले. ३५७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत ५५ धावांत तंबूत पाठवला.

विराट कोहली ( ८८) , शुबमन गिल ( ९२) आणि श्रेयस अय्यर ( ८२) यांच्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून निघाले. रवींद्र जडेजाने २४ चेंडूंत ३५ धावा करून भारताला ८ बाद ३५७ धावांपर्यंत पोहोचवले. वर्ल्ड कप स्पर्धेत एकही वैयक्तिक शतक न होता एखाद्या संघाकडून झालेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी २०१९मध्ये पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध ८ बाद ३४८ धावा केल्या होत्या.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. मोहम्मद शमीने ५-१-१८-५ अशी अविश्वसनीय स्पेल टाकून श्रीलंकेला हादरे दिले. मोहम्मद सिराज ( ३-१६), जसप्रीत बुमराह ( १-८) व रवींद्र जडेजा ( १-४) यांनी मोहीम फत्ते केली आणि श्रीलंकेचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत ५५ धावांत तंबूत परतला.

भारताने ३०२ धावांनी हा सामना जिंकला आणि वन डे क्रिकेटमध्ये दोन वेळआ ३००+ धावांनी विजय मिळवणारा तो एकमेव संघ ठरला. २०२३ मध्येच भारताने श्रीलंकेवरच ३१७ धावांनी विजय मिळवला होता. हे दोन्ही विजय रोहित शर्माच्या नावावर नोंदवले गेल्याने असा पराक्रम करणारा तो जगातला पहिला कर्णधार ठरला.

वन डे क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत चौथा मोठा विजय ठरला. २०२३मध्ये भारताने त्रिवेंद्रम येथे श्रीलंकेवर ३१७ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( ३०९ वि. नेदरलँड्स, २०२३) व झिम्बाब्वे ( ३०४ वि. यूएई, २०२३) यांचा क्रमांक येतो. वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा मोठा विजय ठरला.

भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ४५ विकेट्सचा विक्रम आज मोहम्मद शमीने स्वतःच्या नावावर करताना जहीर खान व जवागल श्रीनाथ ( प्रत्येकी ४४) यांना मागे टाकले. जसप्रीत बुमराह ३३ व अनिल कुंबळे ३१ विकेट्ससह टॉप पाचमध्ये आहेत.

वन डे क्रिकेटमधील श्रीलंकेची ही दुसरी निचांक कामगिरी ठरली. २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना ४३ धावा करता आल्या होत्या. १९८६ मध्ये वेस्ट इंडिजने शाहजाह येथे त्यांना ५५ धावांवर गुंडाळले होते.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या एकाच पर्वात सर्वाधिक वेळा डावात ४ विकेट्स घेण्याच्या विक्रमात मोहम्मद शमी भारतीयांमध्ये अव्वल ठरला. जगात त्याच्या पुढे शाहिद आफ्रिदी व मिचेल स्टार्क ( प्रत्येकी ४) हे आहेत. २०१९मध्येही शमीने ३ वेळा इनिंग्जमध्ये ४ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या होत्या.

वन डे क्रिकेटच्या इतिहासात सलग तीन सामन्यांत ४ किंवा त्याहून अधिक विकेट्स एकापेक्षा जास्त वेळा घेणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये ४-४०, ४-१६ व ५-५९ अशी कामगिरी केली होती. पाकिस्तानचा वकार युनिस याने तीनवेळा ( १९९० मध्ये दोन आणि १९९४मध्ये एक) असा पराक्रम केला आहे.