विराट, रोहितने विश्वविक्रम रचले; सोबत टीम इंडियाच्या नावावरही ८ मोठे पराक्रम लिहिले गेले

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : विराट कोहलीचे पन्नसावे शतक अन् श्रेयस अय्यरच्या वेगवान शतकाच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३९८ धावांचे लक्ष्य ठेवले. हा सामना अनेक विक्रमांनी गाजला.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीत सर्वाधिक १९ षटकारांचा विक्रम आज भारतीय संघाने नावावर नोंदवला. २०१५च्या उपांत्यपूर्व फेरीत वेस्ट इंडिजने १६ ( वि. न्यूझीलंड) षटकार खेचले होते.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. भारताने आज न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद ३९७ धावा उभ्या केल्या. २०१५ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडने ६ बाद ३९३ धावा ( वि. वेस्ट इंडिज) केल्या होत्या आणि तो विक्रम आज भारताने मोडला.

वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताची ही तिसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. भारताने २००७ मध्ये बर्म्युडाविरुद्ध ५ बाद ४१३ आणि २०२३ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध ४ बाद ४१० धावा चोपल्या होत्या. आज भारतीय संघाने १९९९ मध्ये श्रीलंकेविरुद्धचा ६ बाद ३७३ धावांचा विक्रम मोडला.

वर्ल्ड कपच्या एका डावात सर्वाधिक ८ षटकारांचा विक्रम आज श्रेयस अय्यरने नावावर केला. त्याने सौरव गांगुली ( वि. श्रीलंका, १९९९) व युवराज सिंग ( वि. बर्म्युडा, २००७) यांचा ७ षटकारांचा विक्रम मोडला.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीत एका डावात ३ फलंदाजांनी फिफ्टी प्लस धावा करण्याची ही चौथी वेळ आहे. ऑस्ट्रेलियाने २००३च्या फायनलमध्ये ( वि. भारत), भारताने २०११च्या उपांत्यपूर्व फेरीत ( वि. ऑस्ट्रेलिया) आणि न्यूझीलंडने २०१५च्या उपांत्य फेरीत ( वि. दक्षिण आफ्रिका) असा पराक्रम केला होता.

श्रेयसनेही ६७ चेंडूंत शतक झळकावले. वर्ल्ड कपमध्ये भारतीयाकडून झालेले हे तिसरे जलद शतक ठरले. लोकेश राहुलने ६२ चेंडूंत ( वि. नेदरलँड्स, २०२३) आणि रोहित शर्माने ६३ चेंडूंत ( वि. अफगाणिस्तान २०२३) शतक झळकावले होते.

२००३ मध्ये सौरव गांगुलीने उपांत्य फेरीत ( वि. केनिया) शतक झळकावले होते आणि त्याच्यानंतर वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये विराट व श्रेयस यांनी शतक झळकावले. वर्ल्ड कपमध्ये बाद फेरीत शतक झळकावणारे भारताचे तीन फलंदाज झाले आहेत.

वर्ल्ड कपच्या बाद फेरीत एकाच डावात भारताकडून दोन शतक झळकले गेल्याची ही पहिलीच वेळ ठरली. श्रीलंकेच्या उपुल थरंगा आणि तिलकरत्ने दिलशान यांनी २०११ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत असा पराक्रम केला होता.