होऊ दे कल्ला ! रोहित शर्माला नेदरलँड्सविरुद्ध ७ मोठे विक्रम मोडण्याची संधी, सचिनलाही टाकेल मागे

ICC ODI World Cup IND vs NED Live : टीम इंडिया १२ नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. नेदरलँड्सचा पराभव करून मेन इन ब्लू त्यांचा १०० टक्के विजयाचा विक्रम कायम ठेवू इच्छितो. कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात ७ मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो . रोहितने ८ सामन्यांत ४४२ धावा केल्या आहेत.

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार : रोहितने २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या २४ वन डे सामन्यांमध्ये एकूण ५८ षटकार मारले आहेत. एका कॅलेंडर वर्षात वन डेत सर्वाधिक षटकार मारणारा तो संयुक्तपणे अव्वल फलंदाज ठरला आहे. एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला फक्त एक षटकार मारावा लागेल. डिव्हिलियर्सने २०१५ मध्ये २० वन डेमध्ये ५८ षटकार मारले होते.

दोन वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ५००+ धावा करणारा सचिन नंतर दुसरा भारतीय : रोहित शर्माने २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप मधील आठ सामन्यांमध्ये ४४२ धावा केल्या आहेत. ५०० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी ५८ धावांची गरज आहे. जर तो असे करण्यात यशस्वी झाला तर, वन डे वर्ल्ड कपच्या दोन आवृत्त्यांमध्ये ५००+ धावा करणारा तो सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय ठरेल. सचिन तेंडुलकरने १९९६ मध्ये ५२३ आणि २००३ मध्ये ६७३ धावा केल्या होत्या. रोहितने २०१९ मध्ये नऊ सामन्यांमध्ये ६४८ धावा केल्या.

वन डे वर्ल्ड कपच्या एका आवृत्तीत भारतीय कर्णधाराकडून सर्वाधिक धावा : वन डे वर्ल्ड कपच्या एका आवृत्तीत भारतीय कर्णधाराने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर आहे. त्याने २००३ मध्ये ११ सामन्यांत ४६५ धावा केल्या होत्या. रोहितच्या नावावर ४४२ धावा असून गांगुलीला मागे टाकण्यासाठी त्याला आणखी २४ धावांची गरज आहे.

वन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय कर्णधार : रविवारी भारताने नेदरलँड्सचा पराभव केल्यास, रोहित शर्मा वन डे वर्ल्ड कपच्या एका आवृत्तीत सलग नऊ सामने जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनेल. रिकी पाँटिंगनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा कर्णधार ठरणार आहे. सध्या, रोहितने सौरव गांगुलीच्या २००३ मधील सलग ८ सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

वन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद १५०० धावा करणारा फलंदाज : रोहितला हा विक्रमासाठी ८० धावा कराव्या लागतली. वन डे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण चार फलंदाजांनी १५०० हून अधिक धावा केल्या आहेत. रोहितने उद्या ८० धावा केल्यास तर तो पाचवा फलंदाज ठरेल आमि सर्वात जलद म्हणजे २६ डावांमध्ये असा पराक्रम करणारा फलंदाज ठरेल.

वन डे सामन्यात ११ संघांविरुद्ध शतक झळकावणारा तिसरा फलंदाज : रोहित रविवारी नेदरलँड्सविरुद्ध शतक झळकावण्यात यशस्वी ठरला, तर तो त्याच्या वन डे कारकिर्दीत ११ संघांविरुद्ध वन डे शतक झळकावणारा रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरेल.

वन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार : रोहितने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत खेळलेल्या २५ वन डे वर्ल्ड कप सामन्यांत ४५ षटकार मारले आहेत. रविवारी नेदरलँड्सविरुद्ध पाच षटकार मारण्यात तो यशस्वी ठरला, तर तो वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलचा ४९ षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडेल.