पुणे तिथे काय उणे! IND vs BAN मॅचमध्ये चाहत्यांची भन्नाट पोस्टरबाजी; 'क्रश'चा बोलबाला

ICC ODI World CUP 2023, BAN vs IND : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याचा आनंद लुटण्यासाठी पुणेकरांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर तोबा गर्दी केली.

वन डे विश्वचषकातील सतरावा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये पार पडला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याचा आनंद लुटण्यासाठी पुणेकरांनी तोबा गर्दी केली.

क्रिकेटप्रेमींचा उत्साह एवढा की काही चाहते डोंगरावरून तर काही जण घराच्या छतावरून सामन्याचे साक्षीदार झाले. यासह चाहत्यांनी विविध प्रकारचे भन्नाट पोस्टर झळकावून अनेकांचे लक्ष वेधले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टरमुळे पुन्हा एकदा 'पुणे तिथे काय उणे' याचा प्रत्यय आला. चला तर मग पाहूया पुण्यात झालेल्या सामन्यादरम्यान व्हायरल झालेले भन्नाट पोस्टर्स.

काहींनी क्रशचा दाखला देत पोस्टर झळकावले तर अतिउत्साही चाहत्यांनी प्रसिद्धीसाठी कंपनीतील बॉसचीच खिल्ली उडवली.

एका मुलीने तर 'विराटने शतक झळकावल्यास ब्रेकअप करेन', अशा आशयाची पोस्टरबाजी केली. हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उत्साही चाहत्यांनी भारतीय कर्णधार आणि सर्वांचा लाडका 'हिटमॅन' रोहित शर्माप्रती पोस्टरच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त केले.

एका चाहत्याने तर भन्नाट आशयाचे पोस्टर झळकावले. "जोपर्यंत रोहित शर्मा विश्वचषकाची ट्रॉफी उंचावणार नाही तोपर्यंत मी कोणालाच डेट करणार नाही", असे पोस्टरवर लिहल्याचे दिसते.

तसेच काही चाहत्यांनी 'रोहित माझा देव' असल्याचे पोस्टर झळकावले.

बांगलादेशला पराभूत करून यजमान भारतीय संघाने वन डे विश्वचषकात विजयाचा चौकार लगावला. विराट कोहलीने शानदार शतक झळकावून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

बांगलादेशने दिलेल्या २५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने स्फोटक सुरूवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडून विजयाकडे कूच केली. मात्र, रोहित त्याच्या अर्धशतकाला मुकला आणि (४८) धावांवर बाद झाला. तर, गिल ५५ चेंडूत ५३ धावांची खेळी करून तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली नाबाद (१०३) आणि लोकेश राहुलने नाबाद (३४) धावा करून भारताच्या विजयाचा चौकार मारला.