इंदूर कसोटीबाबत BCCIला दिलासा; ICC ने निर्णय बदलला; ऑस्ट्रेलियाचा झाला होता मोठा विजय

ICC on indore pitch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या चार कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये खेळला गेला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या चार कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये खेळला गेला. इंदूरमध्ये 1 मार्चपासून खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला होता.

यानंतर इंदूरच्या खेळपट्टीला आयसीसीने तीन डिमेरिट गुण दिले होते. आयसीसीने बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी 14 दिवसांचा अवधी दिला होता.

खरं तर आता बीसीसीआयच्या उत्तरानंतर आयसीसीने आपला निर्णय बदलला असून तीन ऐवजी एकच डिमेरिट पॉइंट दिला आहे. त्यामुळे बीसीसीआयला इंदूरच्या खेळपट्टीवरून मोठा दिलासा मिळाला आहे.

बीसीसीआयच्या आवाहनानंतर व्यवस्थापक वसीम खान, आयसीसी पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले आयसीसी पुरुष क्रिकेट समितीचे सदस्य रॉजर हार्पर यांनी इंदूर कसोटी सामन्याचे फुटेज तपासले आणि अनेक पैलूंवर लक्ष दिले आणि आज अखेर याबाबत आपला निर्णय बदलला.

यानंतर खेळपट्टीला 'अत्यंत खराब' ऐवजी सरासरीपेक्षा कमी दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इंदूरच्या खेळपट्टीला आता तीन ऐवजी एकच डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.

इंदूर कसोटी सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, सामन्याच्या पहिल्या दिवशी फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर 14 विकेट पडल्या, तर दुसऱ्या दिवशी या खेळपट्टीवर 16 विकेट पडल्या.

लक्षणीय बाब म्हणजे अडीच दिवस चाललेल्या या सामन्यात फिरकीपटूंनी 31 पैकी 26 बळी घेतले, तर वेगवान गोलंदाज केवळ चार बळी घेऊ शकले. त्यामुळे आयसीसीने कसोटी क्रिकेटच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या खेळपट्टीला तीन डिमेरिट गुण दिले होते.

त्यावेळी आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी अहवालात लिहिले होते, ''खेळपट्टी खूपच कोरडी होती. त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये समतोल साधला गेला नाही. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना सुरुवातीपासूनच मदत मिळाली. सामन्याच्या पाचव्या चेंडूपासून खेळपट्टी तुटल्याचे पाहायला मिळाले. या खेळपट्टीमुळे वेगवान गोलंदाजांना मदत झाली नाही आणि संपूर्ण सामन्यात चेंडू अधिकच उसळी घेत होता."

आयसीसीद्वारे खेळपट्टीचे निरीक्षण केले जाते. जर एखाद्या स्टेडियमला ​​पाच वर्षांमध्ये पाच किंवा त्याहून अधिक डिमेरिट गुण मिळाले, तर त्या स्टेडियमवर एक वर्षाची बंदी घातली जाते.

त्यामुळेच आता इंदूरच्या खेळपट्टीला तीन ऐवजी एक डिमेरिट गुण मिळाल्याने बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाला आहे.