भारतीय हवाई दलातील अधिकारी खेळणार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप!

भारतीय महिला क्रिकेट संघ ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात भारतीय हवाई दलातील अधिकारीचा समावेश आहे. शिखा पांडे असे या ऑलराऊंडरचे नाव आहे.

क्रिकेटच्या प्रेमापोटी शिखानं हवाई दलातील अधिकारी पदाची नोकरी सोडली आणि अथक मेहनतीच्या जोरावर तिनं आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या संघात स्थानही पटकावलं.

पाच वर्षांची असताना शिखानं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. पण, वडील शिक्षक असल्यानं त्यांचा जोर अभ्यासावर होता. त्यामुळे शिखा अभ्यासातही अव्वल राहिली.

गोवा युनिव्हर्सिटीतून बीटेक केल्यानंतर 2010मध्ये शिखाचा कॅम्पससाठी निवड झाली होती, परंतु क्रिकेटच्या प्रेमामुळे ती गेली नाही. 2011मध्ये तिला भारतीय एअर फोर्समध्ये ग्राऊंड ऑफिसर पदावर नोकरी मिळाली. पण, क्रिकेटवरील प्रेम तिला स्वस्थ बसू देत नव्हते.

तिनं कुटुंबीयांकडे एक वर्ष आणखी क्रिकेट खेळण्याची परवानगी मागितली आणि त्यानंतर तिनं मागे वळून पाहिले नाही. क्रिकेटमध्ये एकेक टप्पे पार करत शिखानं आज वर्ल्ड कप साठीच्या संघात स्थान पटकावलं आहे. ती आता भारतीय हवाई दलात आता फ्लाईट लेफ्टनंट आहे.

शिखानं टीम इंडियाकडून दोन कसोटी सामने खेळले आहेत. 52 वन डे सामन्यांत तिनं 507 धावा आणि 73 विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये तिनं 40 सामन्यांत 175 धावा व 26 विकेट्स घेतल्या आहेत.