मी त्याला थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही, कारण... ; आशिष नेहराचं मोठं विधान

IPL 2024 Ashish Nehra on Hardik Pandya's move - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ नवीन संघासह मैदानावर उतरणार आहेत. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातली लढत पाहण्यासारखी असणार आहे, कारण गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या आता मुंबईचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

गुजरातला मागील दोन वर्षांत दोन्ही वेळेत अंतिम फेरीत ( २०२२ मध्ये जेतेपद) घेऊन गेला होता. हार्दिकच्या निर्णयाचा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, पण मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा याचे म्हणणे काही वेगळे आहे.

गुजरात टायटन्स आयपीएल २०२४ मध्ये शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. जरी तो सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, आणि नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ४५२ धावा त्याने केल्या आहेत. हाच फॉर्म घेऊन तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. गिलला कर्णधार म्हणून फारसा अनुभव नाही आणि त्यामुळे टायटन्सची कामगिरी कशी होते याची उत्सुकता आहे.

मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी पत्रकारांना सांगितले की, "गिल कर्णधार म्हणून कसे काम करतो हे पाहण्यासाठी फक्त मीच नाही तर संपूर्ण भारत खूप उत्सुक आहे. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करू पाहत आहे. त्यामुळे आम्ही एक फ्रँचायझी म्हणून, सपोर्ट स्टाफ म्हणून, त्याला एक व्यक्ती, एक कर्णधार म्हणून प्रगती करताना पाहण्यासाठी व त्याला मदत करण्यासाठी खरोखरच उत्सुक आहोत. तो पुढे नक्कीच चांगला कर्णधार होईल.''

"आणि तुम्हाला माहिती आहे, हार्दिकने सुद्धा गुजरात टायटन्सचे नेतृत्व करण्यापूर्वी कुठेही कर्णधारपद भूषवले नव्हते. त्यामुळे गिल हा काही पहिले उदाहरण नाही. तुम्हाला असे अधिकाधिक लोक दिसतील. श्रेयस अय्यर अगदी नितीश राणा सारख्या खेळाडूंना अनुभव नसताना कर्णधारपद भूषवले आहे. त्यामुळे या सर्व मुलांसाठी हा एक चांगला अनुभव आहे आणि पाहू या की कोण त्याचा फायदा घेतो." गिलने गुजरात टायटन्ससाठी दोन वर्षात १३७३ धावा केल्या आहेत.

टायटन्सचा हंगाम २४ मार्च रोजी सुरू होणार आहे आणि पहिल्याच लढतीत त्यांचा सामना हार्दिकच्या मुंबई इंडियन्सची होणार आहे. नेहराने त्याला २०२२ मध्ये लखनौ सुपर जायंट्सऐवजी गुजरात टायटन्समध्ये सामील होण्यास सांगितले होते.

मुंबई इंडियन्समध्ये परत जाण्याच्या हार्दिकच्या निर्णयावर नेहरा म्हणाला, "मी त्याला समजवण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. कारण तुम्ही जितके जास्त खेळत तितके अधिक अनुभवी होता. जसे की तो इथे आला आणि दोन वर्षे खेळला. तो मुंबई इंडियन्ससोडून दुसऱ्या संघात गेला असता तर मी त्याला रोखू शकलो असतो. गुजरात टायटन्स हार्दिक पांड्याला मिस करेल, परंतु ही त्याच्यासाठी एक नवीन संधी आहे. दरवर्षी आयपीएल तुम्हाला काहीतरी नवीन. आमच्याकडून [त्याला] शुभेच्छा."