Join us

IPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...

By बाळकृष्ण परब | Updated: September 30, 2020 19:21 IST

Open in App
1 / 8

भारताचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत आपल्या फलंदाजीची छाप पाडू शकलेला नाही. स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करत असलेल्या विराटला तीन सामन्यांत मिळून केवळ १८ धावाच जमवता आल्या आहेत. त्यामुळे विराटच्या फॉर्मबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आता भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही विराटच्या फॉर्मबाबत भाकित केले आहे.

2 / 8

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या खराब फॉर्मबाबत बोलताना गावस्कर यांनी केलेल्या टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला होता. मात्र आता गावस्कर यांनी सुमार फलंदाजीमुळे टीकेचे लक्ष्य होत असलेल्या विराट कोहलीचा बचाव केला आहे.

3 / 8

विराट कोहलीच्या खराब फॉर्ममुळे सध्या आरसीबीच्या चाहत्यांच्या मनात अनेक शंका आहेत. मात्र स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात विराट कोहली चांगली करेल, अशी अपेक्षा गावस्कर यांनी व्यक्त केली आहे. विराट आयपीएल २०२० मध्ये किमान ४०० ते ५०० धावा फटकावेल, असे भाकित सुनील गावस्कर यांनी केले आहे.

4 / 8

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळता आहे. या तीन सामन्यात विराट कोहलीला अनुक्रमे १४, १ आणि ३ एवढ्याच धावा काढता आल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचा फैलाव सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने केलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही विराटला विशेष चमक दाखवता आली नव्हती.

5 / 8

परवा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात झालेल्या लढतीवेळी गावस्कर म्हणाले होते की, विराट कोहलीच्या क्लायबाबत प्रत्येकजण चांगलेच जाणतो. जर तीन सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत राहिली असेल तर तो अशा प्रकारचा फलंदाज आहे की, शेवटच्या सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून धावा निघतील.

6 / 8

कदाचित विराटने या हंगामात संथ सुरुवात केली असेल. मात्र हंगाम संपेपर्यंत त्याचा ४०० ते ५०० धावा झालेल्या असतील. एक वर्ष होते जेव्हा त्याने एक हजार धावाही केल्या होत्या. कदाचित यंदाच्या हंगामात त्याला ९०० धावा करता येणार नाहीत. कारण पहिल्या तीन सामन्यात त्याची बॅट शांत राहिली आहे. मात्र या हंगामात तो एकूण ५०० धावा जमवेल, असे गावस्कर म्हणाले.

7 / 8

विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत पाच हजार ४३० धावा फटकावल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. आयपीएल २०१६ मध्ये विराटने १६ सामन्यात ८१.०८ च्या सरासरीने ९७३ धावा कुटल्या होत्या. या दरम्यान त्याने चार शतके ठोकली होती.

8 / 8

आता यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पुढील सामना शनिवारी अबूधाबीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.

टॅग्स :विराट कोहलीसुनील गावसकरIPL 2020