Rohit Sharma And Rahul Dravid: राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी पायउतार व्हावे; हरभजन सिंगने जाहीर केले नवे कोच अन् कॅप्टन

भारतीय संघाला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले आहे.

भारतीय संघाला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने 10 गडी राखून मोठा विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताच्या खराब कामगिरीनंतर भारतीय संघावर विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच काहींनी तर कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा सल्ला दिला आहे. 2021च्या टी-20 विश्वचषकानंतर मागील नोव्हेंबरमध्ये राहुल द्रविड यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

भारतीय संघाला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडकडून झालेल्या दारूण पराभवामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. 4 साखळी सामने जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र उपांत्य फेरीत आज इंग्लिश संघाने भारताचा 10 गडी राखून मोठा पराभव केला. भारताने दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लिश संघाने केवळ 16 षटकांत पूर्ण केला. या विजयासह इंग्लिश संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने चालू विश्वचषकात चाहत्यांना निराश केले. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात देखील रोहित 27 चेंडूत 28 धावांची सावध खेळी करून तंबूत परतला. संपूर्ण विश्वचषकात रोहित धावा काढण्यासाठी संघर्ष करत होता. मागील वर्षापासून रोहित भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. रोहित-द्रविड या जोडीने जागतिक स्पर्धांमध्ये भारताला गौरव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय संघाचा प्रशिक्षक असलेले द्रविड यांनी भारतीय युवा खेळाडूंना अ संघ स्तरावर मार्गदर्शन केले होते, तर रोहितला आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून यश मिळाले होते.

गुरूवारी ॲडिलेडमध्ये भारतीय संघाचा दारूण पराभव झाला कारण कोणत्याच भारतीय गोलंदाला बळी पटकावता आला नाही. सुरूवातीच्या खराब फलंदाजीनंतर हार्दिक पांड्याने 63 धावांची ताबडतोब खेळी केली. ही खेळी वगळता विराट कोहलीने 50 धावांची साजेशी खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाला 169 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या जोस बटलर आणि ॲलेक्स हेल्स या सलामीच्या जोडीने शानदार खेळी केली. विक्रमी 170 धावांची भागीदारी नोंदवून इंग्लंडने 16 षटकांत 170 धावा करून फायनलचे तिकिट मिळवले.

भारतीय संघाला आलेल्या अपयशानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने भारतीय संघाच्या टी-20 संघात बदल करण्याचा सल्ला दिला आहे. भारताच्या पराभवानंतर इंडिया टुडेशी बोलताना हरभजन सिंगने म्हटले, भारताला फॉर्मेट समजून घेणारा नवा मार्गदर्शक हवा आहे आणि त्यासाठी नुकताच खेळातून निवृत्त झालेला माजी क्रिकेटपटू असावा. यासाठी माझ्या मते आशिष नेहरा ही भूमिका पार पाडू शकतो असे हरभजन सिंगने म्हटले.

भारतीय संघाचा आगामी प्रशिक्षक हा नुकताच टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झालेला खेळाडू असावा असे हरभजनचे मत आहे. "फॉरमॅट समजून घेणार्‍या एखाद्या नवीन व्यक्तीला तुम्ही आणू शकता. तुम्हाला माहिती आहे राहुल द्रविडचा मी आदर करतो तो माझा सहकारी होता आणि आम्ही एकत्र खूप क्रिकेट खेळलो आहे. तो खूप हुशार आहे, पण मला वाटते की जर तुम्हाला द्रविडला टी-20 आंतरराष्ट्रीयमधून प्रशिक्षक म्हणून काढून टाकायचे असेल त्याच्या जागी अलीकडेच निवृत्त झालेल्या खेळाडूची निवड करा." अशा शब्दांत भज्जीने द्रविड यांनी पायउतार व्हायला हवे असे संकेत दिले आहेत.

आशिष नेहरा हा एक असा खेळाडू आहे ज्याला क्रिकेटचे खूप ज्ञान आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्समध्ये त्याने काय केले ते पाहा. आशिष संघात काय आणेल हे सर्वांना कळेल त्याच्यामुळे युवा खेळाडूंना देखील प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी कोणताही खेळाडू असावा मात्र नुकताच निवृत्त झालेला खेळाडू असणे गरजेचे आहे, अशा शब्दांत हरभजनने राहुल द्रविड यांच्या जागी आशिष नेहराला संधी द्यायला हवी असे सूचवले आहे.

हरभजन सिंगने भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण असावा याचे नावही जाहीर केले आहे. "कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्या हा माझा पर्याय आहे. यापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. तो संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि तुम्हाला त्याच्यासारख्या आणखी काही लोकांची संघात गरज आहे." अशा शब्दांत माजी फिरकीपटूने हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवावे असा सल्ला दिला.

भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने विश्वचषकात आपल्या खेळीने सर्वांना निराश केले. हिटमॅन रोहितने विश्वचषकातील 6 सामन्यांमध्ये 19.33 च्या सरासरीने आणि 106.42 च्या स्ट्राईक-रेटने केवळ 116 धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहितच्या खेळीवर सर्वच स्तरातून प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच त्याच्या कर्णधारपदावर देखील टांगती तलवार असल्याचे पाहायला मिळत आहे.