पोटाची खळगी भरण्यासाठी एकेकाळी उचलायचा कचरा, आज जग त्याला युनिव्हर्स बॉस म्हणतं...

आपण एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या महान क्रिकेट खेळाडूबद्दल बोलत आहोत.

आयुष्यात कधीही हार मानू नये असे म्हणतात. एखादी गोष्ट करण्याची जिद्द माणसाला असेल तर यश आपोआपच मिळत जाते. जीवनात ज्याच्याकडे संपत्ती आहे, त्यालाच यश मिळते असे नाही. गरीब कुटुंबातील व्यक्तीचेही नशीब बदलू शकते.

दरम्यान, आपण अशाच एका किंग्स्टनमधील गरीब कुटुंबात जन्मलेल्या महान क्रिकेट खेळाडूबद्दल बोलत आहोत. आज त्याचा वाढदिवस आहे. त्याला संपूर्ण जग 'युनिव्हर्स बॉस' म्हणून ओळखते. तो आहे, वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेल, जो आज 44 वर्षांचा झाला आहे.

ख्रिस गेलला क्रिकेटच्या मैदानावर लांबलचक षटकार मारताना सगळ्यांनीच पाहिलं असेल, पण फार कमी लोकांना माहीत असेल की, त्याने आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी कचराही उचलला होता. ख्रिस गेलच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया.

ख्रिस गेलचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी किंग्स्टन, जमैका येथे झाला होता. क्रिकेटच्या मैदानावर वेस्ट इंडिज संघाकडून खेळताना त्याने असे अनेक पराक्रम केले आहेत, जे आयुष्यभर स्मरणात राहतील.

ख्रिस गेलने 23 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत मिळवलेल्या यशानंतर सर्वजण त्याला सलाम करत आहेत. विशेषत: टी-20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेलने सर्वाधिक चांगली कामगिरी केली. जेव्हा-जेव्हा ख्रिस गेल फलंदाजी करत असे, तेव्हा विरोधी कॅम्पमध्ये भीतीचे वातावरण होते.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नाही, तरीही आता ख्रिस गेल वेस्ट इंडिज संघापासून दूर आहे, कारण त्याच्या वाढत्या वयामुळे त्याला फारशी संधी दिली जात नाही. आता त्याच्या बॅटला पूर्वीसारखी धार नाही.

दरम्यान, जेव्हा टी-20 विश्वचषक सुरू झाला तेव्हा 2007 मध्ये पहिल्या सत्रात ख्रिस गेलने आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली होती. टी-20 विश्वचषकातील पहिले शतक ख्रिस गेलच्या नावावर आहे. पहिल्या टी-20 विश्वचषकात भारत चॅम्पियन झाला असला तरी ख्रिस गेलनेही इतिहासात आपले नाव नोंदवले.

यासोबतच टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही ख्रिस गेलच्या नावावर आहे. या फॉरमॅटमध्ये ख्रिस गेलने 463 सामन्यांमध्ये 22 शतके ठोकली आहेत, जी टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा ख्रिस गेल हा पहिला फलंदाज आहे, ज्याने हा पराक्रम दोनदा केला आहे. त्याचबरोबर, एकदिवसीय सामन्यात द्विशतक, टी-20 मध्ये सर्वाधिक धावा, शतक आणि षटकार झळकावले आहेत.

क्रिकेटच्या जगात यशस्वी होण्यापूर्वी, ख्रिस गेलने आपल्या बालपणात अनेक प्रसंग जवळून पाहिले आहेत. गरीब कुटुंबात जन्म घेतल्यानंतर त्याला उदरनिर्वाहासाठी रस्त्यावरून पाण्याच्या बाटल्या विकूनही जीवन जगावे लागले.