हार्दिकलाच मुंबईच्या संघात जायचं होतं, त्याच्या निर्णयाचा आम्हाला आदर; गुजरातने स्पष्ट केली भूमिका

hardik pandya news update : आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात दिसणार आहे.

क्रिकेट वर्तुळात मागील दोन दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू असलेला हार्दिक पांड्या आज अधिकृतरित्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा सदस्य झाला. पांड्याने आपल्या संघात घरवापसी केली असून आयपीएल २०२४ मध्ये तो मुंबईच्या ताफ्यात दिसणार आहे.

हार्दिकच्या नेतृत्वात पदार्पणाच्याच हंगामात गुजरात टायटन्सला किताब पटकावण्यात यश आलं होतं. याशिवाय आपल्या दुसऱ्या हंगामात टायटन्सने उपविजेतेपद पटकावले.

मात्र, संघाला यशस्वीरित्या चालवत असलेल्या हार्दिकला गुजरातच्या फ्रँचायझीने अचानक सोडल्यानंतर क्रिकेट विश्वात संभ्रमाचे वातावरण पसरले. अशातच गुजरातच्या फ्रँचायझीचे डायरेक्टर विक्रम सोलंकी यांनी पडद्यामागील बाबी सांगून चर्चेला पूर्णविराम दिला.

हार्दिक पांड्याला त्याच्या घरच्या संघात जायचे होते, त्याचीच इच्छा असल्याकारणानेच त्याला मुंबईच्या संघात पाठवले गेले, असे सोलंकी यांनी स्पष्ट केले.

विक्रम सोलंकी म्हणाले, "गुजरात टायटन्सचा पहिला कर्णधार म्हणून हार्दिकने अप्रतिम कामगिरी केली. पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावण्याची किमया त्याच्या नेतृत्वात संघाने साधली. हार्दिकच्या मदतीने फ्रँचायझीने दोन्हीही हंगामात आपली छाप सोडली."

तसेच पांड्यानेच मुंबईच्या संघात घरवापसी करायची इच्छा बोलून दाखवली. त्याच्या या निर्णयाचा आम्हाला आदर असून आम्ही त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

आपल्या घरच्या संघात पुनरागमन झाल्यानंतर हार्दिकने आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर एक पोस्ट करत पांड्याने आठवणींना उजाळा दिला. आयपीएल २०१५ च्या हंगामातून पांड्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात केली. मुंबईकडून खेळताना प्रसिद्धी मिळवलेल्या पांड्याने याच जोरावर पुढे भारतीय संघात जागा मिळवली.

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणाच्या (२०२२) हंगामातच विक्रम नोंदवला. पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला पहिल्याच हंगामात किताब जिंकण्यात यश आलं.

हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. खरं तर गुजरातच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची मोठी फळी असून शुबमन गिल व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर हे नामांकित खेळाडू गुजरातच्या ताफ्यात आहेत.