८ Fours, ८ Sixes! ग्लेन मॅक्सवेलचा कहर; वर्ल्ड रेकॉर्डची नोंद अन् रोहितच्या विक्रमाशी बरोबरी

Glenn Maxwell Records in IND vs AUS 3rd T20I नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ७ बाद ९१ अशा पराभवाच्या छायेत गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला ग्लेन मॅक्सवेलने नाबाद २०१ धावा करून विजयाचा सूर्य दाखवला होता. आज तशाच खेळीची पुनरावृत्ती गुवाहाटी येथे भारतीय संघाविरुद्ध पाहायला मिळाली.

२२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ १३४ धावांत माघारी परतला होता. ३९ चेंडूंत विजयासाठी ८८ धावांची गरज असताना मॅक्सवेल उभा राहिला. त्याने ८ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी करून शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

ऋतुराज गायकवाड ५७ चेंडूंत १३ चौकार व ७ षटकारांसह १२३ धावांवर नाबाद राहिला. २४ धावांवर २ फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवसह ऋतुराजने डाव सावरला. सूर्यकुमार यादव २९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारासह ३९ धावांवर झेलबाद झाला आणि ऋतुराजसह त्याची ५७ ( ४७ चेंडू) धावांची भागीदारी तुटली. तिलकने नाबाद ३१ धावा करताना ऋतुराजसह ५९ चेंडूंत १४१ धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाला २ बाद २२२ धावांपर्यंत पोहोचवले.

ट्रॅव्हिस हेड ( ३५), आरोन हार्डी ( १६), जोश इंग्लिस ( १०), मार्कस स्टॉयनिस ( १७) व टीम डेव्हिड ( ०) माघारी परतल्याने ऑस्ट्रेलियाची हार पक्की मानली जात होती. पण, मॅक्सवेल व कर्णधार मॅथ्यू वेड जोडी उभी राहिली. या दोघांनी ४० चेंडूंत ९१ धावांची नाबाद भागीदारी केली. शेवटच्या ४ चेंडूंत १६ धावा हव्या असताना मॅक्सवेलने ६,४,४,४ धावा चोपून ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने विजय पक्का केला. मॅक्सवेल ४८ चेंडूंत ८ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १०४ धावा चोपल्या. वेड १६ चेंडूंत २३ धावांवर नाबाद राहिला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०मध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक ३७ षटकारांचा विक्रम आज ग्लेन मॅक्सवेलने नावावर केले. सर्बियाच्या लेस्ली ड्युनबरने बल्गेरियाविरुद्ध ४२ षटकार खेचले आहेत. त्यानंतर रोहित शर्माचा ( ३९ षटकार वि. वेस्ट इंडिज) क्रमांक येतो.

भारताविरुद्ध ट्वेंटी-२०त ५०० हून अधिक धावा करणारा ग्लेन मॅक्सवेल हा तिसरा फलंदाज बनला. निकोलस पूरनने सर्वाधिक ५९२ धावा केल्या आहेत, त्यापाठोपाठ मॅक्सवेल ( ५५४), आरोन फिंच ( ५००), जोस बटलर ( ४७५), दासून शनाका ( ४३०) व मॅथ्यू वेड ( ४२९) यांचा क्रमांक येतो.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील भारताविरुद्ध धावांचा यशस्वी पाठलाग करण्याच्या विक्रमात आजच्या सामनाचा पहिला क्रमांक लागला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने दिल्ली येथे भारताने विजयासाठी ठेवलेल्या २१२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ४ शतकांच्या रोहित शर्माच्या विक्रमाशी आज ग्लेन मॅक्सवेलने बरोबरी केली. सूर्यकुमार यादव, कॉलिन मुन्रो व बाबर आजम यांच्या नावावर प्रत्येकी ३ शतकं आहेत. पण, लक्ष्याचा पाठलाग करताना ट्वेंटी-२०त तीन शतकं झळकावणारा ग्लेन मॅक्सवेल हा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.

मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाकडून सर्वात कमी ४७ चेंडूंत ट्वेंटी-२०त शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. आरोन फिंचने ( वि. इंग्लंड, २०१३) आणि जोश इंग्लिस ( वि. भारत, २०२३) यांनी ४७ चेंडूंत शतक झळकावले होते.