Virat Kohli 5 Best Knocks: ICC ने निवडल्या किंग कोहलीच्या बेस्ट 5 इनिंग्ज; पाहा पाकिस्तानविरूद्धच्या 'विराट' खेळी!

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने होते. या सामन्यात विराट कोहलीने शानदार नाबाद ८२ धावांची खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

टी-२० विश्वचषकात रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला. पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यामुळे भारतात सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. भारताच्या विजयाचा हिरो किंग कोहलीने तमाम भारतीयांची दिवाळी गोड केली. विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी विराट कोहलीच्या या खेळीचे कौतुक केले आहे. विराट कोहलीने या सामन्यात ५३ चेंडूत ८२ धावांची शानदार खेळी केली. कोहलीच्या या विराट खेळीमुळे भारतीय संघाने स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.

२०१२ मध्ये विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडला होता. याच वर्षी किंग कोहलीने पाकिस्तानविरूद्ध एक शानदार खेळी केली होती. सुरूवातीला १९ चेंडूत १६ धावांवर खेळणाऱ्या कोहलीने आक्रमक पवित्रा धारण करून पाकिस्तानला पळता भुई थोडी केली. श्रीलंकेतील कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर त्याने ६१ चेंडूत नाबाद ७८ धावांची खेळी करून पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

२०१४चा विश्वचषक भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक होता कारण अंतिम फेरीत श्रीलंकेकडून संघाचा पराभव झाला होता. मात्र या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोहलीने ७२* (४४) धावांची खेळी खेळली. शेवटच्या ४ षटकात ४० धावा करायच्या होत्या आणि कोहली एका टोकाला होता आणि त्याला दुसऱ्या टोकाकडून सुरेश रैनाने साथ दिली. कोहलीच्या झंझावाती खेळीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला होता.

पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीच्या बॅटने नेहमीच जोरदार फटकेबाजी केली आहे. याचाच एक प्रत्यय २०१६च्या विश्वचषकात पाहायला मिळाला होता. त्या सामन्यात कोहलीने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता आणि अवघ्या ३७ चेंडूत ५५ धावा करून नाबाद राहिला होता. कोलकाता येथे खेळलेल्या या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

2016 मध्ये कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि प्रत्येक संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होता. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मोहालीच्या मैदानावर विराटने आक्रमक खेळी केली होती. त्याने केवळ ५१ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या होत्या. या खेळीनंतर कोहलीने ही त्यावेळची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी असल्याचे म्हटले. विराटने अनेकवेळा या खेळीचा विशेष उल्लेख केला आहे.

विराटने अलीकडेच पार पडलेल्या पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली आहे. टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची देखील सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाच्या अवघ्या ३१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. अशा स्थितीत किंग कोहलीने नाबाद ८२ धावांची खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.