विराट, धोनी अन् रोहितसह हे ९ खेळाडू पहिल्या हंगामापासून गाजवताहेत IPL चं मैदान

आयपीएलचं १८ वे वर्ष, पहिल्या वर्षापासून खेळणारे हे ९ खेळाडू यंदाच्या हंगामातही जलवा दाखवण्यासाठी आहेत सज्ज

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या १८ व्या हंगामाला २२ मार्च पासून सुरुवात होत आहे. २००८ च्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी या लीगमध्ये खेळण्याला पसंती दिलीये. इथं एक नजर टाकुयात अशा ९ खेळाडूंवर जे पहिल्या हंगामापासून यंदाच्या हंगामापर्यंत आहेत आयपीएल स्पर्धेचा भाग

रोहित शर्मा यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. तो पहिल्या हंगामापासून आयपीएल स्पर्धेचा भाग आहे. डेक्कन चार्जर्सकडून खेळताना पहिल्यांदा त्याला आयपीएल चॅम्पियन खेळाडू असा टॅग लागला. त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विक्रमी पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

विराट कोहली हा देखील पहिल्या हंगापासून सातत्याने या स्पर्धेचा भाग राहिलाय. विशेष म्हणजे तो सुरुवातीपासून आरसीबी या एकाच फ्रँचायझीकडून खेळताना दिसते.

एमएस धोनी हा चेन्नई सुपर किंग्सजा आयकॉन आहे. यंदाच्या हंगामात तो अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली CSK च्या संघाला पाच वेळा जेतेपद मिळवून दिले आहे.

आर अश्विन हा पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून खेळताना दिसणार आहे. २००८ मध्ये पहिल्या हंगामातही तो याच संघाचा भाग होता. पण २००९ च्या हंगामात त्याला पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. सीएसकेशिवाय तो राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज, पुणे सुपरजाएंट्स आणि दिल्ली फ्रँचायझी संघाच्या ताफ्यातून खेळताना पाहायला मिळाले आहे.

रवींद्र जडेजानं पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये पदार्ण केले. सध्याच्या घडीला चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातील प्रमुख खेळाडू असलेल्या जड्डूच्या नावे आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्डही आहे. २०२१ च्या हंगामातत्याने आरसीबीच्या हर्षल पटेलविरुद्ध आयपीएलच्या इतिहासात एकाच षटकात सर्वाधिक धावा ३७ धावांचा विक्रम नोंदवला होता.

ईशांत शर्मा हा दिल्ली कॅपिटल्सनंतर यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून मैदानात उतरणार आहे. पहिल्या हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून खेळताना दिसला होता.

मनीष पांडे याने मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून पहिल्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले. सात वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून खेळणारा हाखेळाडू आयपीएलमध्ये शतकी खेळी करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. २००९ च्या हंगामा त्याने आरसीबीकडून खेळताना शतकी खेळी केली होती.

केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा देखील पहिल्या हंगामापासून या स्पर्धेत खेळताना दिसतोय. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती.

स्वप्नील सिंह हा आयपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. पण त्याला पहिल्या हंगामात खेळण्याची संधी मिळाली नाही. नऊ वर्षानंतर २०१७ मध्ये तो पंजाब किंग्जकडून त्याने कमबॅक केले. दोन वर्ष या संघाचे प्रतिनीधीत्व केल्यावर २०२३ च्या हंगामात तो लखनौच्या ताफ्यात दिसला. यंदाच्या हंगामात तो आरसीबीकडून खेळत आहे.