फिरकीचा जादुगर 'मुरलीधरन' दिसणार मोठ्या पडद्यावर; वाढदिवशी '800'चा फर्स्ट लूक रिलीज

Happy Birthday Muttiah Muralitharan : श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन त्याच्या जादुई फिरकीमुळे जगभर प्रसिद्ध आहे.

श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन त्याच्या जादुई फिरकीमुळे जगभर प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या फिरकीच्या तालावर जगातील अनेक दिग्गज फलंदाजांना नाचवले.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मुरलीधरनचे वर्चस्व आहे. जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजापैकी एक मुरलीधरनचा करिश्मा आता रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. कारण त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट '800'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

मुथय्या मुरलीधरनने त्याच्या वाढदिवशी आपल्या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. श्रीलंकेच्या दिग्गजाने आज ५१व्या वर्षात पदार्पण केले आहे.

मुथय्या मुरलीवर बनत असलेल्या चित्रपटाचे नाव '800' असे आहे, जी त्याने घेतलेल्या कसोटी सामन्यातील बळींची संख्या देखील आहे. त्याच्या या बायोपिकमध्ये अभिनेता मधुर मित्तल फिरकीपटूची भूमिका साकारत आहे.

खरं तर तामिळमध्ये बनणारा हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. श्रीलंकेच्या दिग्गजाचे भारतातील तामिळनाडू राज्याशी खास नाते आहे.

मुरलीधरनचे पूर्वज भारतीय होते, ज्यांना इंग्रजांनी श्रीलंकेमध्ये चहाच्या बागांमध्ये काम करण्यासाठी पाठवले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीपती यांनी म्हटले, "चित्रपट '800'च्या माध्यमातून केवळ मुरलीधरनचा जीवनप्रवास अनुभवता येणार नाही, तर अनेकांना यातून ऊर्जा आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. एक सामान्य माणूस मेहनतीच्या जोरावर असामान्य जागी जाऊ शकतो हे या बायोपिकमध्ये पाहायला मिळेल."

"मुरलीधरन जगातील एक नंबरचा गोलंदाज कसा बनला? त्याचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळतील, त्यात त्याच्या देशात सुरू असलेल्या उलथापालथीचाही आधार घेण्यात आला आहे", असे दिग्दर्शक श्रीपती यांनी अधिक सांगितले.

मुरलीधरन आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी गोलंदाजांच्या यादीत तब्बल १,७११ दिवस अव्वल स्थानी राहिला आहे. त्याने २१४ कसोटी सामने खेळले असून ८०० बळी घेतले आहेत. त्याने २००४ मध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्सला मागे टाकले. तर २००७ मध्ये ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नला मागे टाकले.

याशिवाय श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे मुरलीधरनने भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरचा बळी घेऊन वन डे क्रिकेटमध्ये ५०२ बळी पूर्ण केले. गंभीरच्या बळीसह त्याने पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमचा मोठा विक्रम मोडीत काढला.

चित्रपट 'स्लमडॉग मिलेनियर'मध्ये सलीमची भूमिका साकारणारा अभिनेता मधुर मित्तल चित्रपट '800' मध्ये मुरलीधरनची भूमिका साकारत आहे. मुरलीधरनसारख्या दिग्गजाची भूमिका साकारणे म्हणजे खूप मोठी गोष्ट असून ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे अभिनेता मित्तलने सांगितले आहे.