T20 WC: भारत वर्ल्ड कप फायनल नाही खेळणार; इंग्लंडच्या दिग्गजाचा दावा, जाहीर केले २ फायनलिस्ट

T20 World Cup 2024: आयपीएल २०२४ नंतर जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा पार पडेल.

आगामी काळात क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आयपीएल २०२४ नंतर जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा पार पडेल. वेस्ट इंडिज आणि यूएसएच्या संयुक्त यजमानात ही बहुचर्चित स्पर्धा खेळवली जाईल.

भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ स्पर्धेचे प्रबळ दावेदार असतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. पण, इंग्लिश संघाचा माजी खेळाडू नासिर हुसेनने एक मोठा दावा केला असून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना होईल असे म्हटले आहे.

आयसीसीशी बोलताना हुसेनने दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषक जिंकण्यासाठी फेव्हरेट असल्याचे नमूद केले. आफ्रिकन संघ इंग्लिश संघाविरूद्ध ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ ची फायनल खेळेल असेही त्याने सांगितले.

दक्षिण आफ्रिकेचा संघ ट्वेंटी-२० क्रिकेटच्या दृष्टीने मजबूत असून त्यांच्याकडे कगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्खिया यांसारखे घातक गोलंदाज आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका स्पर्धेचा प्रबळ दावेदार असेल, असे हुसेनने म्हटले.

दरम्यान, ट्वेंटी-२० विश्वचषक सुरू होण्यासाठी फक्त सहा महिने उरले आहेत. त्याआधी आयपीएल सारखी मोठी स्पर्धा होणार आहे, ज्यामुळे खेळाडूंची तयारी मजबूत होण्यास खूप मदत होईल.

मात्र, आगामी विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार? यावरून संभ्रम आहे. कारण मागील ट्वेंटी-२० विश्वचषकापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली ट्वेंटी-२० क्रिकेटच्या विश्वापासून दूर आहेत.

त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया आगामी विश्वचषक खेळणार का हे पाहण्याजोगे असेल. याशिवाय बीसीसीआय रोहित आणि विराटबद्दल काय निर्णय घेते हे देखील महत्त्वाचे असेल.