IND vs NZ : भारताची गाडी ब्रेक फेल झालेल्या ट्रेनसारखी सुसाट; टीम इंडियाचं अक्रमकडून अभिनंदन

icc odi world cup 2023 : २००३ नंतर भारतीय संघाला एकदाही आयसीसी इव्हेंटमध्ये न्यूझीलंडला पराभूत करता आले नव्हते.

न्यूझीलंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळवून टीम इंडियाने २० वर्षांचा दुष्काळ संपवला. २००३ नंतर भारतीय संघाला एकदाही आयसीसी इव्हेंटमध्ये न्यूझीलंडला पराभूत करता आले नव्हते.

पण, यंदाच्या विश्वचषकात हा लाजिरवाणा विक्रम मोडित काढण्यात रोहितसेनेला यश आले. कठीण खेळपट्टीवर विराट कोहलीने ९५ धावांची अप्रतिम खेळी केली आणि भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली. खरं तर तब्बल २० वर्षांनंतर भारताने आयसीसी इव्हेंटमध्ये न्यूझीलंडला पराभूत केले आहे. धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात विजय मिळवून भारताने क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे.

ऐतिहासिक विजयानंतर सर्वच स्तरातून टीम इंडियाचे कौतुक होत आहे. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू वसिम अक्रमने त्याच्या शैलीत विराट कोहलीच्या खेळीला दाद देताना भारतीय संघाचे अभिनंदन केले.

वसिम अक्रम म्हणाला की, या स्पर्धेत भारतीय संघाचा खेळ ब्रेक फेल झालेल्या ट्रेनसारखा आहे, त्यामुळे त्यांना थांबवणे अशक्य असल्याचे दिसते. त्यांच्याकडे सर्वगुण संपन्न असलेल्या खेळाडूंची फळी आहे. नियोजनानुसार खेळी करून प्रतिस्पर्धी संघाला चीतपट करण्यात ते माहिर आहेत. अक्रम पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीशी बोलत होता.

हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले होते. हार्दिक पांड्यांच्या जागी फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आला तर शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळाली.

मिळालेल्या संधीचा फायदा घेताना शमीने पाच बळी घेऊन भारताचे सामन्यात पुनरागमन केले. २० वर्षांचा दुष्काळ संपवून भारताने अखेर न्यूझीलंडला पराभूत करण्यात यश मिळवले.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारताने चांगली सुरूवात केली. पण, डॅरिल मिशेल (१३०) आणि रचिन रवींद्र (७५) यांनी यजमानांची डोकेदुखी वाढवली. अखेर निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २७३ धावा करून किवींनी भारतासमोर २७४ धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीरांनी स्फोटक सुरूवात केली. रोहित शर्मा (४६) आणि शुबमन गिल (२६) धावा करून तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. त्याला श्रेयस अय्यरने (३३) चांगली साथ दिली. मात्र, अय्यर बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा नाबाद ३९ धावांची खेळी करून अखेरपर्यंत टिकून राहिला.

सामन्याचा हिरो विराट कोहली मात्र त्याच्या शतकाला मुकला आणि (९५) धावांवर बाद झाला अन् 'विराट' खेळीच्या जोरावर भारताने ४ गडी आणि १२ चेंडू राखून विजय साकारला. दरम्यान, भारताचा आगामी सामना गतविजेत्या इंग्लंडसोबत २९ ऑक्टोबर रोजी लखनौमधील एकाना स्टेडियमवर होणार आहे.