विराट कोहली, रोहित शर्मा यांनी ट्वेंटी-२० संघातील जागा रिक्त करावी - रवी शास्त्री

२०२४साली होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला भारतीय संघाने आतापासूनच सुरुवात करायला हवी. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ( Ravi Shastri) त्या स्पर्धेसाठी टीम इंडियाने कोणत्या खेळाडूंना संधी द्यायली हवी याबाबत सांगताना मोठे विधान केले आहे.

ट्वेंटी-२० संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या पुढे जाण्याची वेळ टीम इंडियावर आली असून युवा खेळाडूंना लगेचच संघात संधी मिळायला हवी, असे मत शास्त्री यांनी व्यक्त केले.

ESPNcricinfo च्या शोमध्ये रवी शास्त्री म्हणाले, “टीम इंडिया आयपीएलनंतर पहिली ट्वेंटी-२० मालिका खेळेल त्यात युवा खेळाडूंना संधी दिली पाहिजे. यशस्वी जैस्वाल, जितेश शर्मा आणि तिलक वर्मा या खेळाडूंना तत्काळ संधी द्यायला हवी. रोहित आणि विराटसारख्या खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केले आहे. ते काय आहेत, हे कोणापासून लपलेले नाही. पण, आता युवा खेळाडूंना संधी मिळताना पाहायला आवडेल. जेणेकरून विराट आणि रोहितसारखे खेळाडू वन डे आणि कसोटी क्रिकेटसाठी ताजेतवाने राहतील.''

रोहित-कोहली आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंना ट्वेंटी-२० क्रिकेट खेळायचे असेल तर काय?, असा प्रश्न शास्त्रींना विचारण्यात आला. ते म्हणाले, “२०२४ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला अजून एक वर्षाहून अधिक कालावधी बाकी आहे. टीम इंडियातील निवडीचा निकष हा फक्त सध्याचा फॉर्म असावा. एक वर्ष खूप मोठा कालावधी आहे. खेळाडू फॉर्ममध्ये असू शकतात किंवा त्यांचा फॉर्म जाऊ शकतो. संघ निवडीतही अनुभव, फिटनेस महत्त्वाचा ठरेल. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू कोण, कोणाच्या कामगिरीत सातत्य आहे, धावा कोण करत आहे? हे सर्व पैलूही पाहायला हवेत.

शास्त्री यांचेही मत आहे, की प्रत्येक क्रमांकासाठी स्पेशालिस्ट खेळाडूंची निवड करावी. कोणत्याही खेळाडूला त्याने यापूर्वी न खेळलेल्या भूमिकेची सक्ती केली जाऊ नये. संघात डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांचे चांगले मिश्रण देखील आवश्यक आहे. कारण आयपीएलमध्ये ज्या संघात असे कॉम्बिनेशन आहे, तो संघ चांगली कामगिरी करत आहे.

रवी शास्त्री यांनी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याला ट्वेंटी-२० मध्ये टीम इंडियाचा कायम कर्णधार बनवण्याची मागणी केली आहे. हार्दिकने गुजरात टायटन्स संघाला ज्या प्रकारे तयार केले आहे, ते पाहता तो टीम इंडियासाठीही योग्य खेळाडूंची निवड तो करू शकतो, असे शास्त्रींना वाटते. ''हार्दिकच्या गुजरात टायटन्स संघाकडे पाहून तुम्ही समजू शकता. हार्दिकने प्रत्येक नंबरसाठी खेळाडू निश्चित केले आहेत आणि याच विचाराने तो टीम इंडियाला ट्वेंटी-२० मध्ये पुढे नेऊ शकतो,''असे शास्त्रींना वाटते.