T10 Leauge: अबुधाबी टी-10 लीगचा रंगला थरार; रैना पासून श्रीसंतपर्यंत हे भारतीय खेळाडू असणार मैदानात

Abu Dhabi T10 League 2022: 23 नोव्हेंबरपासून अबुधाबी टी-10 लीगचा थरार रंगला आहे. यावेळी या स्पर्धेत भारतीय संघाच्या 5 माजी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

सुरेश रैनाने अबुधाबी टी-10 लीग 2022 च्या हंगामात सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत तो डेक्कन ग्लॅडिएटर्सकडून खेळताना दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नियमांनुसार आयपीएल किंवा देशांतर्गत क्रिकेटशी करार असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंना इतर फ्रँचायझी लीगमध्ये भाग घेण्याची परवानगी नाही. मात्र रैनाने विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती.

सुरेश रैना आयपीएल 2021 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा खेळला होता. त्यानंतर सीएसकेच्या फ्रँचायझीने त्याला रिलीज केले. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात कोणत्याच फ्रँचायझीने रैनाला खरेदी केले नव्हते. आयपीएलमधील निवृत्तीनंतर तो रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज 2022 चा भाग राहिला होता.

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग देखील अबु धामी टी-10 लीगमध्ये खेळत आहे. आयपीएल 2021 मध्ये हरभजन सिंगने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळल्यानंतर डिसेंबरमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हरभजन सिंग या स्पर्धेत दिल्ली बुल्सकडून खेळताना दिसणार आहे.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतची कारकिर्द वादात राहिली आहे. श्रीसंतने 7 वर्षांची बंदी संपल्यानंतर 2020 मध्ये केरळसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, परंतु सलग दोन वर्षे IPL लिलावात निवड न झाल्याने अनुभवी वेगवान गोलंदाजाने या वर्षी मार्चमध्ये निवृत्ती घेतली. श्रीसंत आता टी-10 लीगमध्ये बांगला टायगर्सकडून खेळणार आहे.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने ऑगस्ट 2021 मध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. तेव्हापासून बिन्नी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज आणि अशा इतर लीगमध्ये खेळला आहे. बिन्नी कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखालील न्यू यॉर्क स्ट्रायकर्स या नवीन फ्रॅंचायझीसाठी खेळणार आहे.

कर्नाटक आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा माजी वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनही टी-10 मध्ये दिसणार आहे. 33 वर्षीय वेगवान गोलंदाजाने 4 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजसाठी तो इंडियन लीजेंड्सच्या संघाचा भाग होता. अभिमन्यू हा अबू धाबी टी-10 लीगमधील नॉर्दर्न वॉरियर्स संघाचा भाग आहे.

अबु धामी टी-10 लीगमध्ये एकूण आठ संघ रिंगणात असणार आहेत. बांगला टायगर्स, चेन्नई ब्रेव्ह्स, दिल्ली बुल्स, डेक्कन ग्लॅडिएटर्स, न्यूयॉर्क स्ट्रायकर्स, नॉर्दर्न वॉरियर्स, सॅम्प आर्मी, टीम अबू धाबी अशा संघाचा समावेश असणार आहे. प्रत्येक फ्रँचायझीने आगामी हंगामासाठी आयकॉन खेळाडूचे नामांकन केले आहे.

भारतीय संघाचे माजी दोन दिग्गज सुरैश रैना आणि युवराज सिंग यांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. युवराज सिंग न्यूयॉर्क स्ट्रायकर्स या संघाकडून खेळत आहे.