भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा निवड समितीच्या प्रमुखपदी बसणार; 'योग्य' खेळाडूंना संधी मिळणार

BCCI ने काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या निवड समिती प्रमुखपदासाठी जाहीरात दिली होती. या पदासाठी मोठ्या खेळाडूंनी कधीच अर्ज केला नाही, पण आता योग्य व्यक्ती या पदावर बसणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCC) टीम इंडियाच्या निवड समितीसाठी गुरुवारी अर्ज मागवले. निवड समिती प्रमुखपदासाठी वीरेंद्र सेहवागला विचारणा केली होती, असे वृत्त बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देऊन प्रसिद्ध करण्यात आले होते. पण, भारताचा माजी सलामीवीर सेहवागने हे वृत्त फेटाळून लावले.

चेतन शर्मा यांची हकालपट्टी केल्यापासून, माजी भारतीय खेळाडू शिव सुंदर दास पॅनेलचे अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून काम करत आहेत. बीसीसीआयचे इतर निवडकर्ते एस शरथ (दक्षिणमधून), सुब्रतो बॅनर्जी (केंद्रातून) आणि सलील अंकोला (पश्चिमेकडून) आहेत. बीसीसीआयने निवड समितीसाठी जाहिरात पोस्ट केली आहे. अर्जदाराने एकतर ३० प्रथम श्रेणी सामने, सात कसोटी किंवा १० वन डे सामने आणि २० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत.

त्याने किमान पाच वर्षांपूर्वी निवृत्ती घेतलेली असायला हवी. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. नवीन निवडकर्त्याने "मजबूत बेंच स्ट्रेंथची योजना आखणे आणि तयार करणे" आणि "प्रत्येक फॉरमॅटमध्ये संघासाठी कर्णधाराची नियुक्ती करणे" अशी अपेक्षा केली जाईल. आता या पदासाठी भारताचा वर्ल्ड कप विजेता गोलंदाज अजित आगरकर ( Ajit Agarkar) याचे नाव पुढे येतेय.

मागच्या दोन वेळेसही आगरकरचे नाव चर्चेत होते, परंतु त्याने माघार घेतली. यंदाच्या वर्षी आगरकर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबत कायम राहण्याची शक्यता कमी आहे आणि तो निवड समिती प्रमुख होऊ शकतो. अजित आगरकरने २६ कसोटी, १९१ वन डे आणि ४ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.

सध्या निवड समितीत असलेल्या ४ सदस्यांकडे मिळून ५५ आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. आगरकरने एकट्याने ४४२ आयपीएल सामनेही खेळले आहेत. अशा परिस्थितीत आगरकर निवड समितीचा नवा प्रमुख बनू शकतो.