26 Foreign Players Missing IPL 1st Week : आयपीएल २०२२च्या पहिल्या आठवड्याला २६ परदेशी खेळाडू मुकणार; बघा कोणत्या संघाला सर्वाधिक धक्का बसणार

Foreign Players Missing IPL 2022 1st Week : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात दोन नव्या फ्रँचायझींचा समावेश करण्यात आल्यामुले आता १० संघांमध्ये चषक पटकावण्याची चुरस रंगणार आहे. २६ मार्चपासून आयपीएल २०२२ला सुरुवात होणार आहे, परंतु पहिल्या आठवड्याच्या खेळात स्थानिक खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या १५ व्या पर्वाच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन नव्हे तर तब्बल २६ खेळाडू मुकणार आहेत. वेस्ट इंडिज -इंग्लंड, पाकिस्तान - ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका-बांगलादेश या मालिका सुरू असल्यामुळे फ्रँचायझींना हा फटका बसणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स - ड्वेन प्रेटोरियस ( Dwaine Pretorius) - चेन्नई सुपर किंग्सला फक्त एका परदेशी खेळाडूशिवाय पहिल्या आठवड्यात खेळावे लागणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू ड्वेन प्रेटोरियस याचा दक्षिण आफ्रिकेचा संघात समावेश केला गेला आहे. CSKने त्याला ५० लाखांत आपल्या ताफ्यात घेतले आहे. वन डे मालिकेसाठी त्याचा वन डे संघात समावेश करण्यात आला आहे आणि आफ्रिकेचा कसोटी संघ अद्याप जाहीर केलेला नाही. जर ३२ वर्षीय खेळाडूचा कसोटी संघात समावेश केला गेला तर तो किमान ५ सामने मुकण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्स - जोफ्रा आर्चर ( Jofra Archer (injury) - इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर यंदाच्या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे खेळणार नाही. मुंबई इंडियन्सला याची कल्पना होती, तरीही त्यांनी ८ कोटींत त्याला आपल्या ताफ्यात घेतले. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू डॅनिएल सॅम्स याच्या समावेशाबाबत अद्याप साशंकता होती, परंतु पाकिस्तान दौऱ्यावरील ऑस्ट्रेलियाच्या वन डे व ट्वेंटी-२० संघात त्याचा समावेश नसल्याने तो पहिल्या सामन्यापासून उपलब्ध आहे.

कोलकाता नाइट रायडर्स - पॅट कमिन्स व आरोन फिंच ( Pat Cummins and Aaron Finch) - पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया मालिकेचा कोलकाता नाइट रायडर्सला चांगलाच फटका बसणार आहे. पॅट कमिन्स हा कसोटी संघाचा कर्णधार आहे, तर फिंच हा वन डे व ट्वेंटी-२० संघाचा सदस्य आहे. पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया मालिकेचा अखेरचा सामना ५ एप्रिलला होणार आहे. त्यानंतर आयपीएल २०२२ साठी भारतात आल्यावर त्यांना तीन दिवस क्वारंटाईन रहावे लागेल. त्यामुळे KKRच्या पाच सामन्यांना ही दोघं मुकतील.

राजस्थान रॉयल्स - रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन ( Rassie van der Dussen) - चेन्नई सुपर किंग्सप्रमाणे राजस्थान रॉयल्सलाही दक्षिण आफ्रिकेच्या रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनला पहिल्या आठवड्याला मुकावे लागेल. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याचा वन डे संघात समावेश केला गेला आहे. कसोटी संघात त्याचा समावेश झाल्यास तोही पहिले पाच सामने मुकेल.

सनरायझर्स हैदराबाद - मार्को येनसेन, सीन एबॉट व एडन मार्कराम ( Marco Jansen, Sean Abbott, Aiden Markram) - सनरायझर्स हैदराबादला आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाचा फटका बसणार आहे. ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज सीन एबॉट सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे, कारण पाकिस्तान दौऱ्यासाठी त्याचा वन डे व ट्वेंटी-२० संघात समावेश केला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मार्को व फलंदाज एडन मार्कराम हेही बांगलादेशविरुद्धच्या वन डे संघाचे सदस्य आहेत.

दिल्ली कॅपिटल्स ( डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, एनरिच नॉर्खिया ( दुखापत) David Warner, Mitchell Marsh, Anrich Nortje (injury), Mustafizur Rahman, Lungi Ngidi) - ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा व दक्षिण आफ्रिकेची बांगलादेशविरुद्धची मालिका याचा दिल्ली कॅपिटल्सला सर्वात जास्त फटका बसणार आहे. त्यांनी रिटेन केलेला दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज नॉर्खिया दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - जेसन बेहरेनडॉर्फ, ग्लेन मॅक्सवेल व जोश हेझलवूड ( Jason Behrendorff, Glenn Maxwell, Josh Hazlewood) - RCBला तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सेवेला पहिल्या आठवड्यात मुकावे लागेल. बेहरेनडॉर्फ व हेझलवूड पाकिस्तान दौऱ्यावर आहेत, तर ग्लेन मॅक्सवेलचे २७ मार्चला लग्न असल्याने तो काही सामन्यांना मुकणार आहे.

पंजाब किंग्स - जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, नॅथन एलिस ( Jonny Bairstow, Kagiso Rabada, Nathan Ellis) - यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे आणि तो एक सामना मुकणार आहे. तर ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन एलिस हा चार सामन्यांना मुकू शकतो. आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा एक ते पाच सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

लखनौ सुपर जायंट्स - मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर, कायले मेयर्स, मार्क वूड, क्विंटन डी कॉक ( Marcus Stoinis, Jason Holder, Kyle Mayers, Mark Wood, Quinton de Kock) दिल्ली प्रमाणे लखनौनालाही सुरुवातीला केवळ दोनच परदरेशी खेळाडूंसोबत प्लेइंग इलेव्हन उतरावी लागेल. इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूडला दुखापत झाली आहे, मेयर्स व होल्डर हे इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत खेळत आहेत. स्टॉयनिस पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि तो आयपीएलचे चार सामने मुकणार आहे. क्विंटन डी कॉकही एक ते पाच सामन्यांना मुकू शकतो.

गुजरात टायटन्स - डेव्हिड मिलर व अल्झारी जोसेफ ( David Miller, Alzarri Joseph) - बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमुळे दक्षिण आफ्रिकेचा मिलर आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमुळे वेस्ट इंडिजचा जोसेफ आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यांना मुकणार आहे.