IPL 2020 चा अंतिम फैसला उद्या; 'या' पर्यायांपैकी एकाची होईल निवड

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल 2020) 13 वे मोसम होईल की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे. 29 मार्चला सुरु होणारी ही लीग 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवासांपूर्वी बीसीसीआयनं घेतला.

त्यानंतर संघ मालक आणि बीसीसीआय यांच्यात वारंवार चर्चा होताना दिसत आहे. आयपीएल न होणे हे बीसीसीआय आणि फ्रँचायझी यांच्यासह ब्रॉडकास्टर यांच्यासाठी मोठा आर्थिक नुकसान होणार आहे.

तरीही बीसीसीआय आणि फ्रँचायझी मालक यांनी लोकांच्या सुरक्षेवर अधिक भर दिल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे. त्यामुळेच बंद स्टेडियममध्ये ( प्रेक्षकांविना) ही स्पर्धा खेळवण्याचा प्रस्ताव समोर आला.

पण, सध्याची देशातील परिस्थिती पाहता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर 24 मार्चला म्हणजेच उद्या बीसीसीसीआय आणि फ्रँचायझी मालक यांच्यात कॉन्फरन्स कॉल होणार आहे.

मंगळवारी होणाऱ्या या कॉन्फरन्स कॉलनंतर आयपीएलच्या 13 व्या मोसमाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

यापूर्वी झालेल्या बैठकीत 6-7 पर्यायांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी आयपीएल झाल्यास तिच्या स्वरूपात करण्यात येणारा महत्त्वाचा बदल हा एक पर्याय होता.

आयपीएल 15 एप्रिलनंतर सुरु होणार म्हणजे ती 15 दिवस उशीरानं खेळविण्यात येईल, अशात वेळापत्रक हे लीग स्वरूपाचे करण्यात येईल. त्यात आठ संघांची दोन गटांत विभागणी आणि टॉप फोर संघांमध्ये बाद फेरीचे सामने.

तसेच, परिस्थिती सुधारल्यास आयपीएल कोणत्या तारखेपासून सुरू करायची यावरही चर्चा झाली. त्यानुसार १५ एप्रिल, २१ एप्रिल, २५ एप्रिल, १ मे आणि ५ मे अशा तारखांचा पर्याय ठेवण्यात आला होता.

पण, 25 एप्रिलच्या पुढे गेल्यास आयपीएल खेळवणं मुश्किल होईल. अशात जून-सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्याचाही पर्याय शोधला आहे.

आता मंगळवारी होणाऱ्या बैठकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही स्पर्धा रद्द करण्याचा किंवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

आयपीएलचे 13 वे मोसम जून-सप्टेंबरमध्ये खेळवले जाऊ शकते, परंतु त्याचे काही सामने परदेशात आणि काही भारतात असे स्वरुप असेल.

हाही पर्याय न जमल्यास यंदा आयपीएल स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय होण्याची शक्यत आहे.