दहावीत तीन वेळा नापास, सरकारी नोकरीची आस सोडून घेतला क्रिकेटचा ध्यास, असा आहे कृणाल पंड्याचा जीवनप्रवास

Krunal Pandya Birthday : भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या याने काल एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना फलंदाजी आणि गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या याने काल एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना फलंदाजी आणि गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. कृणाल पंड्या आज त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत असून, त्यानिमित्त एक नजर टाकूया त्याच्या जीवनप्रवासावर

कृणाल पंड्याचा जन्म २४ मार्च १९९१ रोजी झाला होता. देशांतर्गत क्रिकेटमधील बडोदा संघाचा कर्णधार असलेला कृणाल पंड्या भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ आहे. दरम्यान, ३० व्या वाढदिवसापूर्वी एक दिवस आधीच कृणालला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि या संधीचे त्याने सोने केले.

कृणाल पंड्याने क्रिकबझवरील एका कार्यक्रमात आपल्या जीवनातील काही किस्से सांगितले होते. तो म्हणाला होता की, माझे आणि हार्दिकचे फारसे मित्र नव्हते. आम्ही शाळेत जायचो. त्यानंतर तिथून मैदानात जायचो. मी दहावीत तीन वेळा नापास झालो होते. मात्र मी हार मानली नाही. पुढे मी कॉलेजही पूर्ण केले. क्रिकेटपटू झालो नाही तर शिक्षण गरजेचं ठरेल. त्यामुळे काही ना काही करून उदरनिर्वाह करता येईल, असे तो म्हणाला.

कृणाल आणि हार्दिक पंड्याने खूप मेहनतीने यशाचे शिखर गाठले आहे. क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी झुंज असताना सरकारी नोकरीची ऑफरही मिळाली होती. मात्र मी ती ऑफर नाकारली होती. त्यामुळेच आज माझे जीवन बदलून गेले आहे, असे कृणाल म्हणतो. त्यावेळी स्पीड पोस्टमध्ये भरती निघाली होती. मला ट्रायलसाठी पत्र आले होते. २०-२५ हजारांची नोकरी मिळेल, असे वडील म्हणाले होते. मात्र मी ते पत्र फाडले आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेची ट्रायल मॅच खेळण्याचा निर्णय घेतला. त्यात माझी कामगिरी चांगली झाली आणि माझी बडोद्याच्या संघात निवड झाली.

क्रिकेटमधील आपल्याला मिळालेल्या यशामागे वडिलांचे मोठे योगदान असल्याचेही कृणाल पंड्या सांगतो. केवळ ६ वर्षांचा असताना माझ्या वडिलांनी माझ्यातील गुणवत्ता हेरली होती. तेव्हा आम्ही सूरतला राहायचो. तेव्हा वडिलांनी बडोद्याला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. सहसा असा निर्णय हा क्रिकेटमध्ये काही प्रमाणात छाप पाडल्यावर घेतला जातो. मात्र माझ्या वडिलांनी हा निर्णय मी सहा वर्षांचा असतानाच घेतला.

दरम्यान, कृणाल पांड्याने काल एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पदार्पण केले होते. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुठल्याही फलंदाजाने फटकावलेले हे सर्वात वेगवान अर्थशतक ठरले आहे. पंड्याने ३१ चेंडूंचा सामना केला आणि ७ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ५८ धावा ठोकल्या. कृणालने ही खेळी वडील हिमांशू पंड्या यांना समर्पित केली.

Read in English