Fact Check: रोहित शर्मानं ट्विटर प्रोफाईलवरून Indian Cricket Team नाव हटवलं?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) सोमवारी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वन डे, ट्वेंटी-20 आणि कसोटी संघाची घोषणा केली. या घोषणेनंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) हा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या तीनही संघांत उप कर्णधार रोहितचे नाव न दिसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

त्यानंतर रोहित शर्मानं त्याच्या ट्विटर प्रोफाईलमधून Indian Cricket Team हे नाव हटवल्याची चर्चा रंगू लागली आणि खरंच रोहितच्या प्रोफाईलमध्ये 'for enquiry contact ritikasajdeh@gmail.com' इतकेच दिसत आहे. त्यामुळे कालच्या टीम सिलेक्शननंतर या चर्चेनं अधिक वेग पकडला.

त्यात BCCIच्या घोषणेनंतर मुंबई इंडियन्सनं ( Mumabai Indians) नेट्समध्ये सराव करतानाचा रोहितचा व्हिडीओ पोस्ट करून बीसीसीआयविरुद्ध जणू युद्धच पुकारले. बीसीसीआय आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा रंगली.

दुखापतीच्या कारणावरून जर बीसीसीआयनं रोहितचे नाव ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघात निवडले नाही, तर मग हिटमॅन सराव कसा करतोय, हा प्रश्न चाहत्यांना पडला.

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहितला हॅमस्ट्रींगची दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो दोन सामन्यांना मुकला होता. त्यामुळेच त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या तीनही संघात समावेश केला गेला नाही. पण, त्याचवेळी रोहित आणि इशांत यांच्या दुखापतीवर वैद्यकिय अधिकारी लक्ष ठेवून राहतील, असे बीसीसीआयनं स्पष्ट केलं होतं.

पण, मुंबई इंडियन्सनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत रोहित पूर्णपणे तंदुरूस्त दिसत आहे आणि ४५ मिनिटांच्या या व्हिडीओत तो फटकेबाजी करताना दिसत आहे. तरीही बीसीसीआयनं त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून का वगळले, हा प्रश्न पडणे साहजिकच होते.

त्यात रोहितनंही ट्विटर प्रोफाईल बदलल्याची चर्चा सुरू झाली. तसे स्क्रीनशॉटही फिरू लागले. पण, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले स्क्रीनशॉट हे ऑगस्ट महिन्यातील आहेत. तेव्हा असलेलं प्राफाईल आजही कायम आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे या फक्त अफवा आहेत.

Fact Check: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये रोहितच्या फॉलोअर्सची संख्या ही १७ मिलियन दिसत आहे आणि आता ती १७.६ मिलियन झालेली आहे. त्यामुळे तो स्क्रीनशॉट जूना आहे.