IPL 2020: Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक; BCCI कडून क्रिकेटप्रेमींची फसवणूक?

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत देशातील मोठी नावं दाखल झाली होती. टाटा सन्स यांनी टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत उडी घेतल्याने तेच बाजी मारणार असे मानले जात होते. मंगळवारी अखेरच्या क्षणापर्यंत टाटा सन्सच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असा दावा केला जात होता. पण, Dream 11ने बाजी मारली. यंदाची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.

भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे Vivoनं यंदा संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपवरून माघार घेतली. Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते.

त्यानुसार आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022 आणि 2023ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत.

ड्रीम 11नं 222 कोटींत हे स्पॉन्सरशीप नावावर केली असून अनअकॅडमीनं 210, टाटा सन्सनं 180 आणि बायजूनं 125 कोटींची बोली लावली होती. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली.

पण, ड्रीम 11च्या निवडीनं संपूर्ण स्वदेशीचा नारा सत्यात उतरलाय का? ड्रीम 11 ही भारतीय कंपनी आहे का? जाणून घेऊया याबद्दल सर्व काही.

ड्रीम 11 ही चायनीस कंपनी आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. ड्रीम 11वा टर्न ओव्हर 736 कोटींचा आहे. मुंबईतील हर्ष जैन व भावीत सेठ यांनी 2012मध्ये ही कंपनी सुरू केली. 2019मध्ये ही कंपनी भारतातील पहिली गेमींग कंपनी बनली.

पण, ड्रीम 11चं चायनीज कनेक्शन आहे. त्यांच्या कंपनीत Steadview, Kalaari Capital, Think Investments, Multiples Equity आणि Tencent आदी कंपनींचीही गुंतवणूक आहे. Tencent ही चायनीज कंपनी आहे. जगातील सर्वात मोठी गेमिंग कंपनी म्हणून Tencentची ओळख आहे आणि त्यांची ड्रीम 11मध्ये 10 टक्के भागीदारी आहे.

महेंद्रसिंग धोनी हा या कंपनीचा ब्रँड अँम्बेसिडर आहे. त्याच्यासह जोस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, फॅफ ड्यू प्लेसिस, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा, आंद्रे रसेल, जेसन होल्डर आणि केन विलियम्सन यांच्यासोबत वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत करार केला होता.

कॅरेबियन प्रीमिअर लीग, इंडियन सुपर लीग, नॅशनल बास्केटबॉल लीग, प्रो कबड्डी लीग यासह आयसीसी, बीबीएल, डब्लूबीबीएल आणि आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचेही ते प्रायोजक आहेत.