शेतकरी आंदोलनावर ट्विट करणाऱ्या पॉप स्टार रिहानाचा क्रिकेटशी असलेला संबंध तुम्हाला माहिती आहे का?

राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यामुळे चर्चेत आलेली आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना ( Rhanna) हिच्यावर टीका होत आहे. भारतातल्या शेतकरी आंदोलनाचे तिनं समर्थन केलं. त्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी भारतातील अंतर्गत विषयांत नाक खुपसण्याची गरज नाही, असा सल्ला तिला दिला. पण, रिहाना आणि क्रिकेटचं फार जुनं नातं आहे.

रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती.

वेस्ट इंडिज संघातील खेळाडू क्रेग ब्रेथवेट आणि कार्लोस ब्रेथवेट यांच्यासोबत रिहाना एकाच वर्गात शिकली आहे. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाला चिअर करण्यासाठी रिहाना स्टेडियममध्ये पोहोचली होती. तेव्हा विंडीज संघानं तिच्यासोबतचे फोटोही काढले होते.

कार्लोस व रिहाना हे पहिली ते चौथी पर्यंत एकाच वर्गात होते, या दोघांनी बार्बाडोसच्या कॉम्बरमेरे शाळेत शिक्षण घेतले.

रिहाना आणि क्रेग यांच्या डेटच्याही चर्चा रंगल्या होत्या. रिहाना क्रेग ब्रेथवेटपेक्षा चार वर्ष मोठी आहे, पण कायमच ती क्रेगला मदत करायची.

रिहानाने याआधी म्यानमारमधल्या परिस्थितीवरही ट्विट केलं होतं. 2012 साली तिने क्लारा लॉयनेल फाऊंडेशनची स्थापना केली होती. जगभरात शिक्षण आणि इतर कामांसाठी ही संस्था काम करते.

रिहानाचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 साली बार्बाडोसच्या सेन्ट मायकलमध्ये झाला. तिचं नाव रॉबिन रिहाना फेंटी आहे. तिनं कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत कोट्यवधी रुपये दान केले आहेत.