ठरलं! या महिन्यात रिंकू-सरोज जोडी लग्नबंधनात अडकणार! "झुमे जो पठाण..." गाणं वाजणार?

दोघांनी साखरपुडा उरकल्यापासून ही जोडी लग्नबंधनात कधी अडकणार? ही गोष्ट चर्चेत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग मैदानातील कामगिरीशिवाय वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीमुळे चर्चेत आहे.

क्रिकेटर रिंकू आणि उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्या लग्नाचा मुहूर्त कधी? यासंदर्भातील माहिती समोर येत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे लग्नाची तारीख याआधी अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती, मात्र आता कुटुंबीयांनी जून महिन्याची तारीख अंतिम केली आहे.

IPL स्पर्धेसह क्रिकेट हंगाम संपल्यानंतरच विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून रिंकूला कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येईल, अशी माहिती समोर आली आहे.

रिंकू सिंगचा मोठा भाऊ सोनू सिंग यांने दिलेल्या माहितीनुसार, विवाहसोहळा नेमका कुठे होणार याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल. सध्या लखनऊ आणि वाराणसी या ठिकाणांचा विचार करण्यात येत आहे. अलीगड येथे भव्य रिसेप्शन आयोजित करण्याचा प्लॅनही आखण्यात येत असल्याची माहिती रिंकूच्या भावाने दिली आहे.

साखरपुड्यानंतर सुरुवातीला लग्नाची तारीख १८ नोव्हेंबर २०२५ ठरवण्यात आली होती, मात्र व्यस्त क्रिकेट वेळापत्रकामुळे ती पुढे ढकलण्यात आली.

रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा ८ जून २०२५ रोजी लखनऊमध्ये पार पडला होता. राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा विशेष चर्चेत राहिला.

रिंकू सिंह हा IPL मधील केकेआरच्या संघाकडून खेळताना लोकप्रिय झाला. KKR संघाचा मालक शाहरुख खान याने तर थेट तुझ्या लग्नात मी नाचायला येईन, असे म्हटले होते. ही गोष्टही चांगलीच चर्चेत राहिली. त्यामुळे क्रिकेटरच्या लग्नात झुमे जो पठाण शो पाहायला मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.