अजिंक्य रहाणे बनला 'शेतकरी मित्र'; महिंद्रा ग्रुपसोबत केली मोठी गुंतवणूक

भारतीय संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणेनं महिंद्रा ग्रुपच्या 'मेरा किसान' या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रहाणेनं सोशल मीडियावरून ही घोषणा केली.

२०१६ मध्ये मेरा किसान प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. सेंद्रीय पदार्थांशी संबंधित ही कंपनी आहे.

महिंद्रा अँग्री सोल्यूशनचे व्यवस्थापकिय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शर्मा यांनी सांगितले की,''रहाणेनं या कंपनीचे काही शेअर विकत घेतले आहेत. पण, त्यांनी नेमकी किती गुंतवणूक हा आकडा सांगितला नाही.

शेतीशी संबंधित एखाद्या प्रकल्पात क्रिकेटरने गुंतवणूक करण्याची ही पहिलीचं वेळ असणार आहे.

मेरा किसानमधून प्रतिमहिना २-३ कोटी महसूल मिळत असल्याची माहिती शर्मा यांनी दिली. ही कंपनी सध्या १३० हून अधिक प्रोडक्ट विकते.

रहाणे म्हणाला,''सेंद्रीय पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत, असे मला वाटते आणि एका समान ध्येयाने आम्ही एकत्र आलो आहोत. शेतकऱ्यांना प्रगतीसाठी हातभार लावता येत असल्याचा मला आनंद आहे.''

''मेरा किसान ही तीन वर्ष जूनी कंपनी आहे आणि सेंद्रीय पदार्थ हे त्यांचं मुख्य लक्ष्य आहे. ही कंपनी जवळपास ७००० शेतकऱ्यांसोबत काम करते. त्यांना सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देते, असेही तो म्हणाला.

यापूर्वी, सांगली आणि कोल्हापूरला आलेल्या पूरात नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी रहाणेनंही पुढाकार घेतला होता. त्यानं शेतकऱ्यांना जमेल तशी मदत करा, असे आवाहन केलं होतं.

तो म्हणाला होता की, ''माझ्या मते आपले शेतकरी हेच आपले रिअल हीरोज आहेत. आज त्यांना आपली गरज आहे. त्यांच्या मदतीसाठी मी नेहमीच पुढे राहीन कारण त्यांच्याशी असलेला आपला ऋणानुबंध हा कधीही न तुटणारा आहे.''