दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का! IPL 2024 Points Table मधील गुंता अधिक वाढला

IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये बुधवारी गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. GT चा संपूर्ण संघ ८९ धावांत तंबूत पाठवल्यानंतर DC ने हे लक्ष्य ८.५ षटकांत सहज पार केले.

दिल्लीचा हा आयपीएल इतिहासातील मोठा विजय ठरला. त्यांनी ६७ चेंडू राखून ही मॅच जिंकली आणि आयपीएलच्या गुणतालिकेचा गुंता अधिक वाढला. या विजयानंतर दिल्लीने ९व्या क्रमांकावरून थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली. त्यांनी गुजरातला नेट रन रेटच्या जोरावर मागे ढकलले. शिवाय मुंबई इंडियन्सच्या मार्गातही अडथळा निर्माण केला.

राजस्थान रॉयल्स ७ सामन्यांत ६ विजय मिळवून १२ गुणांसह तालिकेत अव्वल स्थानी आहे आणि उर्वरित ७ सामन्यांत २-३ विजय त्यांना प्ले ऑफमधील जागा निश्चित करण्यासाठी पुरेसे आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स व सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्रत्येकी ६ सामन्यांत ४ विजय मिळवून ८ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत सध्या आघाडीवर आहेत.

KKR, CSK, SRH यांचे ८ सामने शिल्लक आहेत आणि त्यातील किमान ४ विजय त्यांच्यासाठी पुरेसे आहेत. लखनौ सुपर जायंट्सचेही ६ सामने झाले आहेत, परंतु त्यांना ३ विजय मिळवता आल्याने त्यांच्या खात्यात ६ गुणच आहेत. त्यांना ७ मध्ये किमान पाच विजय आवश्यक आहेत.

DC चा हा सात सामन्यांतील तिसरा विजय आहे आणि त्यांनी LSG व GT यांच्या सहा गुणांशी बरोबरी केली आहे. पण, त्यांचा नेट रन रेट ( -०.०७४) हा LSG ( ०.०३८) पेक्षा कमी आहे, परंतु GT ( -१.३०३) पेक्षआ जास्त आहे. आता पुढचा संपूर्ण खेळ हा नेट रन रेटवर होणार आहे. LSG ने एक सामना कमी खेळला असल्याने त्यांनी DC व GT ला सध्या मागेच ठेवले आहे.

पंजाब किंग्स व मुंबई इंडियन्सची आता गोची झाली आहे. या दोन्ही सांघांना ६ पैकी २ विजय मिळवता आल्याने ते अनुक्रमे आठव्या व नवव्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांना उर्वरित ८ सामन्यांत किमान ७ विजय मिळवावे लागतील, तरच ते प्ले ऑफच्या शर्यतीत राहतील. पण, त्याही वेळेस इतरांचे निकाल व नेट रन रेट हा निर्णायक ठरेल. तेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ७ मध्ये १ विजय मिळवून तळाला आहेत आणि त्यांना ७पैकी ७ सामने आता जिंकावे लागणार आहेत.