युवा खेळाडू जोमात, सीनियर्स कोमात! ५ खेळाडू जे कदाचित भारतीय संघात आता दिसणार नाहीत

भारतीय संघात बदलाचे वारे वाहत आहेत... ट्वेंटी-२० संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली या सीनियर्सनाही सातत्याने विश्रांती दिली जात आहे. भारताकडे युवा खेळाडूंची तगडी फौज उभी आहे. त्यामुळे आता वन डे व कसोटी संघातही युवा व अनुभवी खेळाडूंचे मिश्रण दिसणार आहे. अशात ५ सीनियर्स खेळाडू कदाचित भारतीय संघाकडून पुन्हा खेळताना दिसणार नाही.

शिखर धवन - भारताकडून एकूण १६७ सामन्यांत ६७९३ धावा करणारा गब्बर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये धवन दहाव्या, तर ट्वेंटी-२०त पाचव्या क्रमांकावर आहे. त्यने २०१५ व २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो सर्वोत्तम खेळाडू होता. पण, १० डिसेंबर २०२२ मध्ये तो भारताकडून शेवटचा सामना खेळला आहे आणि आता त्याच्या पुनरागमनाची शक्यता फार कमीच आहे.

भुवनेश्वर कुमार - स्वींगचा किंग... म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या भुवीने २१ कसोटी, १२१ वन डे व ८७ ट्वेंटी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २५ डिसेंबर २०१२ मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि ट्वेंटी-२०त भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे, परंतु २२ नोव्हेंबर २०२२ पासून तोही राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. त्याने नुकतंच त्याच्या इंस्टाग्राम बायोमधून इंडियन क्रिकेटर काढले आणि निवृत्तीच्या चर्चा रंगल्या.

इशांत शर्मा - कपिल देव यांच्यानंतर भारतासाठी १०० कसोटी सामने खेळणारा दुसरा जलदगती गोलंदाज म्हणून इशांतने विक्रम नावावर केलाय. २९ नोव्हेंबर २०२१पासून तोही भारतीय संघातून बाहेर आहे. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, शार्दूल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा हे युवा गोलंदाज संघात स्थान पटकावण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. भारताकडून २०१६नंतर तो वन डे आणि २०१३ नंतर ट्वेंटी-२० क्रिकेट खेळलेला नाही.

दिनेश कार्तिक - यष्टिरक्षक फलंदाजाने मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधून भारतीय संघात पुनरागमन केले, परंतु तो अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आणि ३८ वर्षीय कार्तिक आता पुनरागमन करेल याची शक्यता कमीच आहे. तो सध्या समालोचकाच्या भूमिकेचा आनंद लुटतोय.

वृद्धीमान साहा - सीनियर यष्टिरक्षक-फलंदाजाल साहा याने ४० कसोटी व ९ वन डे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२१ पासून तो संघाबाहेर आहे आणि रिषभ पंतच्या फॉर्मानंतर त्याचा कसोटी संघात विचार केला गेलेला नाही. रिषभ पंतच्या अनुपस्थितीतही २०२३च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत त्याला खेळवले गेले नाही.