Big News : विराट कोहलीच्या हकालपट्टीवर BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनं सोडलं मौन; म्हणाला, तेव्हा विराटनं आमचं ऐकलं नाही अन्...

BCCI President Ganguly : विराट कोहलीला ( Virat Kohli) वन डे कर्णधारपदावरून अचानक हटवण्यात आल्यानं चाहते नाराज झाले आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं रोहितच्या निवडीबाबत मौन सोडले.

ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा करताना विराटनं स्पष्ट सांगितले होतं की, तो वन डे व कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडण्यास कटीबद्ध आहे. तरीही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं रोहित शर्माची ( Rohit Sharma) निवड होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळेच सोशल मीडियावर BCCIच्या नावानं शिमगा सुरू आहे.

आयसीसी स्पर्धा वगळल्यास विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी ही उल्लेखनीय झालेली आहे. त्यात २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आणि २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची उपांत्य फेरी ही विराटच्या नेतृत्वाखालील कामगिरी तितकी वाईट नक्की नाही. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिज येथे विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वन डे मालिका जिंकल्या आहेत.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 95 वन डे सामन्यांत 65 विजय मिळवले आहेत, तर 27 पराभव पत्करले आहेत. त्यानं कर्णधार म्हणून 72.65च्या सरासरीनं 5449 धावाही केल्या आहेत. तरीही विराटची हकालपट्टी झाल्यानं बीसीसीआयवरील लोकांचा संताप वाढला आहे.

अशात बीसीसीआयकडून आतापर्यंत कोणतीच प्रतिक्रिया आलेली नव्हती, परंतु बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं रोहितच्या निवडीबाबत मौन सोडले. तो म्हणाला,''बीसीसीआय आणि निवड समितीनं मिळून हा निर्णय घेतला आहे. खरं सांगायचं तर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस ही विनंती बीसीसीआयनं विराटला केली होती. पण, त्यानं तेव्हा नकार दिला. त्यानंतर ट्वेंटी-२० व वन डे संघासाठी दोन वेगवेगळे कर्णधार नसावेत, अशी निवड समितीची भूमिका होती. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला.''

''विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व कायम ठेवण्याचा व रोहितकडे वन डे संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला गेला. बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः विराटची चर्चा केली आणि निवड समिती प्रमुख हेही त्याच्याशी बोलले,''असेही गांगुलीनं ANI ला सांगितले.

रोहितच्या कर्णधारपदाविषयी गांगुली म्हणाला,''रोहितच्या नेतृत्व कौशल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि विराट हा कसोटी कर्णधारपदी कायम राहणार आहे. भारतीय क्रिकेट चांगल्या हाती आहे, असे आम्हाला वाटते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून दिलेल्या योगदानासाठी आम्ही विराटचे आभारी आहोत.''

Read in English