Aus vs Eng : ४ ओव्हर, १ मेडन, ७ धावा आणि ६ विकेट्स, स्कॉट बोलँडची पदार्पणातच रेकॉर्डब्रेक कामगिरी

Scott Boland News: मेलबर्नमध्ये झालेल्या ashes seriesमधील बॉक्सिंग डे कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. पहिलाच सामना खेळत असलेल्या स्कॉट बोलँड याने अवघ्या ७ धावांत ६ विकेट्स घेत इंग्लिश संघाचे ऐतिहासिक पतन घडवून आणले.

मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. या सामन्यातील विजयासह मालिकेत ३-० अशी आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने अॅशेसवरही कब्जा केला आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ अवघ्या ६८ धावांत गारद झाला. पहिलाच सामना खेळत असलेल्या स्कॉट बोलँड याने अवघ्या ७ धावांत ६ विकेट्स घेत इंग्लिश संघाचे ऐतिहासिक पतन घडवून आणले. ४ ओव्हर, १ मेडन, ७ धावा आणि ६ विकेट्स ही आकडेवारी त्याच्या कामगिरीबाबत सर्व काही सांगून जाणारी आहे. पदार्पणातील सर्वोत्तम कामगिरीसह बोलँडने अनेक विक्रमांची नोंद केली. हे विक्रम पुढीलप्रमाणे...

स्कॉट बोलँडच्या नावावर कसोटी पदार्पणामध्ये कमी धावा देऊन ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा विक्रम नोंद झाला आहे. बोलँडने इंग्लंडविरुद्ध मेलबर्न कसोटीमध्ये ७ धावा देऊन ६ बळी घेतले. तत्पूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियन गोलंदाज चार्ल्स टर्नर यांच्या नावे होता. त्यांनी १८८७ मध्ये पदार्पण करताना इंग्लंडविरुद्ध १५ धावांत ५ बळी घेतले होते. म्हणजेच स्कॉट बोलँडने पदार्पणाशी संबंधित १३४ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.

स्कॉट बोलँड जर कसोटी पदार्पणात कमी धावा देऊन ६ विकेट टिपणारा गोलंदाज बनला आहे. सोबतच सर्वात कमी षटके टाकून ही कामगिरी करण्याचा विक्रमही बोलँडच्या नावावर नोंद झाला आहे. मेलबर्नमध्ये बोलँडने केवळ ४ षटके टाकून ६ बळी टिपले. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्कच्या नावे होता. त्याने भारताविरुद्ध ६.२ षटकांमध्ये ९ धावा देत ६ बळी टिपले होते.

तसेच ७ धावांत ६ विकेट्स ही कुठल्याही ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची घरच्या मैदानावर पदार्पण करताना तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. बोलँडपेक्षा चांगली कामगिरी केवळ ट्रॉट (८-४३) आणि कँडल (७-५५) यांची आहे. ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेटमध्ये कसोटी पदार्पणात ही सहावी सर्वोत्तम कामगिरी आहे.