Nepal Team created history: सर्वोत्तम धावसंख्या ते सर्वात मोठा विजय! नेपाळचे एका ट्वेंटी-२०त ८ वर्ल्ड रेकॉर्ड

Nepal Team created history: आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेला बुधवारपासून सुरूवात झाली. आशिया चषक स्पर्धेत प्रथमच पात्र ठरलेल्या नेपाळने आशियाई स्पर्धेतही छाप पाडली. पहिल्याच सामन्यात नेपाळने ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ८ मोठे वर्ल्ड रेकॉर्ड मोडले.

मंगोलियाविरुद्धच्या लढतीत नेपाळने ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या उभी केली. नेपाळने आज ३ बाद ३१४ धावा कुटल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटम इतिहासातील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी अफगाणिस्तानने २०१९मध्ये आयर्लंडविरुद्ध ३ बाद २७८ धावा केल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मध्ये आतापर्यंत एकाही संघाला ३००+ धावा करता आल्या नव्हत्या. नेपाळने हाही वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. कुशल मल्ला ( ११३), कर्णधार रोहित पौडेल ( ६१) आणि दिपेंद्र सिंग एैरी ( ५२*) यांच्या जोरावर नेपाळने ३ बाद ३१४ धावांचा डोंगर उभा केला.

नेपाळच्या ३१४ धावांचा पाठलाग करताना मंगोलियाचा संघ १३.१ षटकांत ४१ धावांत तंबूत परतला. नेपाळने २७३ धावांनी हा सामना जिंकला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी २०१९मध्ये झेक प्रजासत्ताकने २५७ धावांनी टर्कीला पराभूत केले होते.

नेपाळचा फलंदाज कुशल मल्लाने ३४ चेंडूंत शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील हे सर्वात जलद शतक ठरले. यापूर्वी डेव्हिड मिलर, रोहित शर्मा आणि झेक प्रजासत्ताकच्या सुदेश विक्रमासेकरा यांच्या नावावर ३५ चेंडूंत शतक झळावण्याचा संयुक्त विक्रम होता.

नेपाळच्या दिपेंद्र सिंग एैरीने ९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने ८ षटकार खेचले आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. यापूर्वी युवराज सिंग, ख्रिस गेल व हझरतुल्लाह झझाई यांनी १२ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. पण, युवराज सिंगचे अर्धशतक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील होते, तर इतरांचे अन्य ट्वेंटी-२० सामन्यात.

दिपेंद्र सिंग एैरीने १० चेंडूंत नाबाद ५२ धावांची खेळी केली आणि त्याचा स्ट्राईक रेट हा ५२० इतका राहिला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये प्रथमच ५००+च्या स्ट्राईक रेटने १० किंवा त्यापेक्षा अधिक चेंडूंवर फटकेबाजी करण्यात आली. २०१६मध्ये झिम्बाब्वेच्या स्थानिक ट्वेंटी-२०त मॅलकॉल्म वॉलरने मटाबेलेलँड टस्कर्स विरुद्ध १० चेंडूंत ४३० च्या स्ट्राईक रेटने धावा कुटलेल्या.

नेपाळने आजच्या सामन्यात एकूण २६ षटकार खेचले आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त एका संघाने एका सामन्यात चोपलेले हे सर्वाधिक षटकार ठरले. यापूर्वी २०१९मध्ये अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध २२ षटकार होते आणि वेस्ट इंडिजनेही त्याचवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २२ षटकार खेचले.

कुशल मल्ला हा १९ वर्ष व २०६ दिवसांचा आहे आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज ठरला. फ्रान्सच्या गुस्ताव्ह मॅकेओनने २०२२ मध्ये हा विक्रम नावावर केला होता.