मोहम्मद सिराजने मैदान गाजवले! मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम, नोंदवले बरेच पराक्रम

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) आज ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने आज ६ विकेट्स घेतल्या, परंतु एका षटकात ४ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला... सर्वात कमी चेंडूंत म्हणजेच १६ चेंडूंत ५ विकेट्स घेणाऱ्या चमिंडा वासच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली.

मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि त्यांचा संपूर्ण संघ १५.२ षटकांत ५० धावांवर माघारी परतला. जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिल्यानंतर सिराजने कंबरडे मोडले. त्याने चौथ्या षटकात पथूम निसंका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका आणि धनंजया डी सिल्वा हे फॉर्मात असलेल्या फलंदाजांना माघारी पाठवले.

२००२ नंतर वन डे क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिल्या १० षटकांत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम सिराजने नावावर केला. २००३ मध्ये जवागल श्रीनाथने जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ विकेट्स घेतल्या होत्या. सिराजने ६ विकेट्स घेत आणखी एक विक्रम नोंदवला. आशिया चषक ( वन डे ) स्पर्धेत ६ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय अन् एकंदर दुसरा गोलंदाज ठरला. श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने भारताविरुद्ध २००८ मध्ये कराची येथे १३ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.

सिराजने ७-१-२१-६ अशी अप्रतिम स्पेल टाकली. हार्दिकने ३ व जसप्रीतने १ विकेट घेतली. श्रीलंकेविरुद्धही ही वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने पाकिस्तानच्या वकार युनिसचा १९९० मध्ये शारजा येथे नोंदवलेला ( ६-२६) विक्रम मोडला.

मोहम्मद सिराजची ६-२१ गोलंदाजी ही भारताकडून चौथी सर्वोत्तम कामगिरी ठरली. स्टुअर्ट बिन्नीने २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध ४ धावांत ६ विकेट्स घेताना अनिल कुंबळे यांचा १९९३ ( ६-१२ वि, वेस्ट इंडिज) सालचा विक्रम मोडला. जसप्रीत बुमराहने २०२२मध्ये इंग्लंडविरुद्ध १९ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.,

वन डे फायनलमधील निचांक कामगिरी ठरली. यापूर्वी २०००मध्ये शाहजाह येथे श्रीलंकेने ५४ धावांवर भारताचा संपूर्ण संघ माघारी पाठवला होता. त्यानंतर २००२मध्ये पाकिस्तानने ७८ धावांवर श्रीलंकेला ऑल आऊट केले होते. आशिया चषकात इनिंग्जमध्ये सर्वच्या सर्व १० विकेट्स जलदगती गोलंदाजांनी घेण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी पाकिस्तानच्या जलदगती गोलंदाजांनी भारताचे सर्व फलंदाज माघारी पाठवले होते.

मोहम्मद सिराज म्हणाला, जणू हे स्वप्नच... त्रिवेंदरम येथे मी श्रीलंकेविरुद्धच अशी कामगिरी केली होती. झटपट ४ विकेट्स घेतल्या होत्या, परंतु पाचवी घेता आली नाही. तुमच्या नशीबात जे असतं ते तुम्हाला मिळतंच... आज फार काही वेगळी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला नाही.