Asia Cup 2022, SL vs BAN : 'नागिन डान्स' करण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूंनी ४ वर्ष वाट पाहिली; जाणून घ्या सेलिब्रेशनमागची ठसन!

Asia Cup 2022, Sri Lanka vs Bangladesh : श्रीलंकेने आशिया चषक २०२२ स्पर्धेत गुरुवारी रोमहर्षक विजयाची नोंद केली. ८ विकेट्स गमावूनही श्रीलंकेने अखेरच्या षटकात बांगलादेशवर विजय मिळवून Super 4 मध्ये प्रवेश केला.

Asia Cup 2022, Sri Lanka vs Bangladesh : श्रीलंकेने आशिया चषक २०२२ स्पर्धेत गुरुवारी रोमहर्षक विजयाची नोंद केली. ८ विकेट्स गमावूनही श्रीलंकेने अखेरच्या षटकात बांगलादेशवर विजय मिळवून Super 4 मध्ये प्रवेश केला. या सामन्यात बांगलादेशने पहिला NO Ball टाकला तो १९व्या षटकात आणि तोच महागात पडला. या विजयानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी 'नागिन डान्स' केला. या सेलिब्रेशनसाठी श्रीलंकेच्या खेळाडूंनी ४ वर्ष वाट पाहिली.

बांगलादेशच्या ७ बाद १८३ धावांत मेहिदी हसन मिराझ ( ३८) व अफिफ होसैन ( ३९) यांच्यासह महमुदुल्लाह व मोसाडेक होसने यांच्या अनुक्रमे २७ व २४ धावांचे मोठे योगदान आहे. वनिंदू हसरंगा व चमिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. असिथा फर्नांडो, महिश थिक्षाना व दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

बांगलादेशने १८४ धावांचे तगडे लक्ष्य उभे केले आणि त्याला श्रीलंकेच्या फलंदाजांकडून सडेतोड उत्तर मिळाले. मात्र, बांगलादेशच्या गोलंदाजांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. इबादत होसैनने टाकलेले १९ वे षटक कलाटणी देणारे ठरले. त्यात षटकांची मर्यादा संथ राखल्याने अखेरच्या षटकात बांगलादेशला ५ खेळाडू ३० यार्ड सर्कलच्या आत उभे करावे लागले. त्याचा श्रीलंकेने फायदा उचलला.

पथूम निसंका ( २०) व कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेला आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या दोन षटकांत त्यांनी ३१ धावा चोपल्या. पण, ४५ धावांची ही भागीदारी पदार्पणवीर इबादत होसैनने तोडली. इबादतने चरिथ असलंकाची ( १) विकेट घेतली. कुसल मेंडिसला आज नशीब साथ देताना दिसले. कुसलने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

कुसल मेंडिसचा दुसऱ्याच षटकात मुश्फीकर रहीमने झेल सोडला, महेदी हसनच्या गोलंदाजीवर मुश्फीकरने झेल घेतला, परंतु तो नो बॉल ठरला. इबादत होसैनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाने झेल टिपला, परंतु बांगलादेशने DRS न घेतल्याने कुसलला आणखी एक जीवदान मिळाले. त्याला रन आऊट करण्याची संधीही गमावली. १५व्या षटकात अखेर मेंडिसला बाद करण्यात बांगलादेशला यश आले. मेंडिसने ३७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या.

श्रीलंकेला आता ३० चेंडूंत ४७ धावांची गरज होती आणि वनिंदू हसरंगा व कर्णधार दासून शनाका खेळपट्टीवर होते. पण, वनिंदू २ धावांवर तस्कीनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. शनाकावर सर्व भिस्त होती आणि नशीबही त्याला साथ देताना दिसले. १८ चेंडूंत ३४ धावा श्रीलंकेना बनवायच्या होत्या. शनाका ३३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४५ धावांवर माघारी परतला.

१९व्या षटकात इबादत गोलंदाजीला आला. चमिका करुणारत्नेनं चतुर फलंदाजी करताना इबादतच्या पहिल्या ३ चेंडूंवर ११ धावा काढल्या. त्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर शाकिबने अचूक थ्रो करून चमिकाला ( १६) रन आऊट केले. ३ विकेट्स घेणाऱ्या इबादतच्या त्या षटकात १७ धावा आल्याने श्रीलंकेला ६ चेंडूत ८ धावाच करायच्या होत्या.

२० व्या षटकात पहिल्या चेंडूवर लेग बाय १ धाव मिळाली. त्यानंतर चौकार गेला अन तिसऱ्या चेंडूवर २ धावा पळून काढताना श्रीलंकेने १८३ धावांची बरोबरी केली. तो चेंडू No Ball ठरला अन् श्रीलंकेच्या धावसंख्येत एक अतिरिक्त धाव जोडली गेली अन् त्यांचा विजयही पक्का झाला. आशिया चषक स्पर्धेतील ही सर्वोत्तम धावांचा पाठलाग करणारी कामगिरी ठरली. श्रीलंकेच्या खेळाडूंनी विजयानंतर नागिन डान्स केला.

२०१८मध्ये निदाहास ट्रॉफीत बांगलादेशने २ विकेट्स राखून यजमान श्रीलंकेला स्पर्धेबाहेर केले होते आणि तेव्हा बांगालदेशच्या सर्व खेळाडूंनी मैदानावर नागिन डान्स केला होता. त्याचा वचपा आज श्रीलंकेने काढताना बांगलादेशला आशिया चषक २०२२ स्पर्धेबाहेर केले.