Asia Cup 2022, IND vs PAK : Ravindra Jadeja ची माघार, टीम इंडियाला कोण देणार आधार? ३ खेळाडू चर्चेत, पाकिस्तानविरुद्ध अशी असेल प्लेइंग इलेव्हन

Asia Cup 2022, India vs Pakistan : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला शुक्रवारी मोठा धक्का बसला. अष्टपैलू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याचे वृत्त BCCI ने दिले. त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनसाठी तीन खेळाडूंची नावं चर्चेत आहेत. त्यात आवेश खानलाही बाकावर बसवले जाऊ शकते...

Asia Cup 2022, India vs Pakistan : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला शुक्रवारी मोठा धक्का बसला. अष्टपैलू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याचे वृत्त BCCI ने दिले. त्याच्या जागी संघात अक्षर पटेलची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अक्षर पटेलची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती, परंतु जडेजाच्या माघारीमुळे त्याची मुख्य संघात एन्ट्री झाली.

पण, जडेजाच्या माघारीनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची रिक्त जागा भरण्यासाठी तीन खेळाडूंच्या नावांची चर्चा आहे. भारताचा पुढील सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आहे. बाबर आजमच्या संघाने शुक्रवारी हाँगकाँगवर दणदणीत विजय मिळवून सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये जडेजाच्या तोडीचा खेळाडू खेळवावा लागेल.

जडेजाने आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्याने सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या यांच्यासह महत्त्वाच्या भागीदारीही केल्या होत्या. त्यामुळे त्याचे स्पर्धेतून बाहेर होणे हा भारतासाठी खूप मोठा धक्का आहे. अक्षर रिप्लेसमेंट म्हणून आलाय खरा, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

रिषभ पंत ( Rishabh Pant ) - दिनेश कार्तिक संघात असताना रिषभ पंतला संधी मिळणे अवघडच होऊन बसले आहे. अशात जडेजाच्या माघारीमुळे रिषभसाठी प्लेइंग इलेव्हनचे दार उघडले गेले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रिषभला संधी दिली गेली नव्हती, हाँगकाँगविरुद्ध हार्दिक पांड्याच्या जागी तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळला. पण, त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. अशात रोहित त्याला आणखी एक संधी देऊ शकतो.

दीपक हुडा ( Deepak Hooda) - रवींद्र जडेजाच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये दीपक हुडा याचे नाव अधिक चर्चेत आहे. पाकिस्तान व हाँगकाँग यांच्याविरुद्ध त्याला संधी न दिल्याने माजी सलामीवीर गौतम गंभीर संतापला होता. दीपकचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला संधी मिळायला हरकत नाही. आयपीएल २०२२मध्येही त्याने दमदार कामगिरी केली आहे. शिवाय त्याची ऑफ स्पिन गोलंदाजी महत्त्वाची ठरू शकते.

आर अश्विन ( Ravichandran Ashwin ) - अनुभवी फिरकीपटू आर अश्विन हाही सक्षम पर्यात रोहितकडे आहे. युजवेंद्र चहल आणि अश्विन ही जोडी पाकिस्तानी फलंदाजांच्या नाकी नऊ आणू शकते. आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सकडून हे दोघंही खेळले आहेत. फलंदाजीतही अश्विनने कमाल दाखवली आहे.

आवेश खानचा फॉर्म पाहता पाकिस्तानविरुद्ध त्याला बाकावर बसवले जाऊ शकते. अशात भारतीय संघ दोन फिरकीपटू व दोन जलदगती गोलंदाजांसह एक अष्टपैलू व सहा फलंदाजांसह मैदानावर उतरू शकते. रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक आर अश्विन/ दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंह, युजवेंद्र चहल असा संघ असू शकतो.